चंद्रपूर-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. रविवार आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर आज ते चंद्रपुरात आहेत. सोमवारी संध्याकाळी चंद्रपुरात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांचं मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंनी शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉपला भेट दिली आणि एक-दोन नव्हे तर चार केक खरेदी केले. केक खरेदी केल्यानंतर ते हॉटेलला रवाना झाले.
राज ठाकरेंनी असे अचानक चार केक खरेदी करण्याचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता असं काही विशेष कारण नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे चंद्रपुरात मुक्कामी असून आज सकाळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेटी घेऊन मार्गदर्शन केलं. त्यानंतर ते पुढे अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
"राज ठाकरेंनी आमच्या दुकानातून चार प्रकारचे केक खरेदी केले. चॉकलेट केक, पायनॅपल केक आणि बटरस्कॉच अशा चार-पाच प्रकारचे केक त्यांनी खरेदी केले", असं केक शॉपच्या मालकानं सांगितलं.
नागपुरातील मनसे कार्यकारणी बरखास्तराज ठाकरेंनी दोन दिवस मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत नागपुरातील सर्व पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. पक्षाला १६ वर्ष होऊनही अपेक्षित यश नागपुरात मिळालेलं नाही आणि नव्या चेहऱ्यांच्या संधी देण्याच्या उद्देशातून कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. नागपुरात राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती.