महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरचा मुक्कामी दौरा आटोपून मंगळवारी दुपारी ३ वाजता अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. राज ठाकरेंनी जिल्ह्यात पक्षात काय सुरु आहे, याचा आढावा घेतला. तसेच पक्ष संघटन मजबूत करा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
राज ठाकरे जेव्हा चंद्रपूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉपला भेट दिली आणि एक-दोन नव्हे तर चार केक खरेदी केले होते. केक खरेदी केल्यानंतर ते हॉटेलला रवाना झाले. राज ठाकरेंचा केक खरेदी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हे केक राज ठाकरेंनी का घेतले, याचं कारण आता समोर आलं आहे. राज ठाकरे यांचे अंगरक्षक आणि सहकारी अनिल पाळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वत: बेकरीत जाऊन केक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हाॅटेलातच बैठक घेतली. जिल्ह्यात पक्षात काय सुरू आहे. याचा अभ्यास करूनच ते आले होते. यापुढे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर प्रत्येकांचा भर असला पाहिजे. पक्षकार्याकडे कोणी दुर्लक्ष करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा दमही ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची असलेली प्रतिमा राज ठाकरे यांना अपेक्षित नसल्याची बाब त्यांच्या बोलण्यातून जाणवत असल्याची चर्चा होती. भविष्यात पक्षात मोठे बदल दिसतील, अशी कुजबुज यावेळी कार्यकर्त्यांत होती.
उद्योजकांच्या समस्यांवर मुनगंटीवारांशी चर्चा करणार-
प्रदूषण न करणारे इलेक्ट्रिकल्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स पार्क यासारखे उद्योग येणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा उद्योजकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. औष्णिक केद्रे, कोळसा कंपन्या आणि सिमेंट उद्योगांकडून लघू उद्योगांना सहकार्य मिळत नसल्याची बाबही लक्षात आणून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातून उपजीविकेसाठी होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवावे, याकडेही राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. हे सर्व विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार आहे. याबाबत जिल्ह्याचे नेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगून ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वस्त केले. यावेळी चंद्रपूर एमआयडीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, उपाध्यक्ष प्रदीप बुक्कावार, सचिव राजेंद्र चौबल व उत्तमकुमार डाखरे, संकेत वाघ, रवींद्र सातपुते हे सदस्य उपस्थित होते.