चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांचे दैनंदिन कामकाज सोयीचे व्हावे, यामध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी महिला, बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. या मोबाईलद्वारे सेविकांना दररोजचे कामकाच अपडेट करावे लागते. मात्र, मागील काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊनमुळे मोबाईल हँग होत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषत: दुर्गम भागामध्ये नेटर्वकच मिळत नसल्याने काम कसे करावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.
जिल्ह्यात पंधराही पंचायत समितीअंतर्गत शहरी, तसेच ग्रामीण भागामध्ये २ हजार ६८४ अंगवाडी, ११९ मिनी अंगणवाडी आहेत. या सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या माध्यमातून दररोजचे कामकाज मोबाईलच्या माध्यमातून अपडेट करावे लागते. यामध्ये पोषण आहार पुरविणे, बालकांसह स्तनदा माता, मुलींच्या आरोग्याच्या नोंदी घेणे, लसीकरण, सहा वर्षांच्या आतील बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे, उपस्थितीची नोंद घेऊन ती मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन भरावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे फाईल पाठविणे त्रासदायक ठरले आहे. यावर पर्याय म्हणून आता ऑफलाईन कामे करावी लागत आहे. यामध्ये मात्र प्रशासकीय गोंधळ होत आहे.
--
जिल्ह्यातील अंगणवाडी
२६८४
अंगणवाडी सेविका
२४३७
मोबाईल वाटप
२६८४
सर्व्हर डाऊनची समस्या
मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या सुरू झाली आहे. विशेषत: ग्रामीण तसेच दुर्गम भागामध्ये ऑनलाईन काम करणे अधिकच त्रासदायक झाले आहे. मोबाईल वारंवार बंदही पडत आहे. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन कामे करावे लागत आहे.
---
कोट
अडचण दूर करण्याचा प्रयत्न मोबाईल नेटवर्क समस्यांमुळे सर्व्हर डाऊन होत आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागात ही समस्या अधिक आहे. समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या ऑफलाईन काम सुरू आहे.
- संग्राम शिंदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण विभाग, चंद्रपूर
----
मोबाईलवरून करावी लागणारी कामे
गृहभेटी देऊन दररोज भरण पोषणची माहिती अपलोड करणे,
मुलांचे वजन, उंची आणि लसीकरणाची माहिती भरणे,
गर्भवतींची नोंद, अन्नप्राशन, पोषण कार्यक्रम, सामुदायिक आरोग्य दिन, पूर्व शालेय शिक्षण कार्यक्रम या आधारित कार्यक्रमांची माहिती देणे.
सर्वेक्षणानुसार लोकसंख्येची माहिती देणे, प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आधार नंबरसह नाव नोंदणी करणे
गर्भवती मिहलेची माहिती देण्यासोबतच गावातील प्रत्येक मुलींची माहिती देणे, जन्म, मृत्यूची नोंद करणे, सहा महिने ते तीन वर्ष बालके, तीन ते सहा वर्ष मुले, गर्भवती माता, स्तनदा माता यांना दर दोन महिन्यांनी आहार वाटप करून त्याची माहिती नोंदविणे.
पल्स पोलिओ अभियान, राजमाता जिजाऊ अभियान, ग्राम आरोग्य पोषण अभियान अशा राष्ट्रीय कामात मदत करणे
अंगणवाडी केंद्राला संबंधित अधिकारी, वरिष्ठांनी भेट दिल्यानंतर या संदर्भातील माहितीची नोंद ठेवणे.