लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे.चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या आदिवासीबहुल गावांमधील सुमारे ७० हजार नागरिकांना फिरत्या रूग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. अनेक गावांमधील नागरिक बरेचदा औषधोपचारासाठी रूग्णालयांच्या ठिकाणी पोहचू शकत नाही व त्यांच्या आजाराचे योग्य निदान होवू शकत नाही, अशा गावांमधील नागरिकांना या फिरत्या रूग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ना. मुनगंटीवार करत आहेत. उर्वी अशोक तिरामल या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे फिरते रूग्णालय अर्थमंत्र्यांच्या पुढाकाराने या परिसरात नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी लवकरच दाखल होत आहे. १४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथे फिरत्या रूग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जनतेच्या सेवेत रूजु झाले आहे. चंद्र्रपूर येथे टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पिटलची सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वेमार्फत लाईफलाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून रूग्णसेवा त्यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली आहे. खनिज विकास निधीच्या माध्यमातुन आदिवासी बहुल भागातील भंगाराम तळोधी, नांदा, जिवती व राजोली या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रूग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह, मेस आदी जनतेच्या सेवेत रूजु झाले आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा व पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता मिळाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालयाला मंजूरी व १५ कोटी खर्चुन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रोगनिदानासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. नेत्रचिकित्सा शिबिरांच्या माध्यमातुन नेत्रचिकित्सा व चष्मे वितरण व मोतिबिंदू शस्त्रक्रिया हा उपक्रम त्यांनी जिल्हाभर राबविला आहे. आदिवासीबहुल गावांमध्ये फिरत्या रूग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा पुरविण्याचा अर्थमंत्र्यांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 3:40 PM
राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे.
ठळक मुद्दे नागरिकांच्या आरोग्य अडचणी दूर होणार