मोबाईलची वाॅरंटी दोन वर्षे होती. ती पण आता संपली आहे. मोबाईल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्यातुलनेत लाभार्थ्याची भरावयाची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाईल हँग होत आहे. मोबाईल बिघडल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी तीन हजाराहून अधिक खर्च येतो. तो खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत असल्याने, त्यांना परवडण्याजोगा नाही. अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप्स डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. तेही ॲप्स इंग्रजीत असल्याने इंग्रजीचे ज्ञान नसलेल्या सेविकांना मोबाईल हाताळणे कठीण जात आहे. ते ॲप्स मराठीत असणे आवश्यक आहे. मात्र तसे काही करण्यात आले नाही. शिवाय बरेचसे मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे मोबाईल परतीचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला.
यावेळी तालुक्यातील १८८ अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल बालविकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कोरपना यांना परत केले.