साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळा मागे पडू नये यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १९ शाळांची माॅडेल स्कूल म्हणून निवड केली आहे. या शाळांतील भौतिक सुविधांसाठी प्रत्येकी १ लाख ५ हजार २६३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यातून शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी आदिवासी उपाययोजने अंतर्गत बाला पेंटिंगसाठी २८ शाळांना प्रत्येकी ८० हजार रुपयांचे वितरण केले आहे. दरम्यान, सत्र २०१७ ते २०२० पर्यंत बांधकाम करण्यात आलेल्या ३४२ वर्गखोल्यांची बाला पेंटिंगअंतर्गत रंगरंगोटी करण्यासाठी १ कोटी २ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. आता माॅडेल स्कूल अंतर्गत सुविधा पुरविण्यासाठी १९ शाळांची निवड करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शाळांना १ लाख ५ हजार २६३ रुपये वितरीत करण्यात आले आहे. हा निधी खर्च करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक निर्णय घेणार आहे.
चार तालुक्यांना झुकते मापजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेचा समावेश असला तरी चिमूर, ब्रह्मपुरी, मूल आणि राजुरा या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना निधी देण्यात आला आहे. या तालुक्यांना झुकते माप देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
२० लाखांचा निधीमाॅडेल स्कूलअंतर्गत भौतिक सुविधांसाठी जिल्ह्यातील १९ शाळांना निधी मिळाला असून या निधीतून शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात येणार आहे. एका शाळेसाठी १ लाख ५ हजार २६३ रुपयांचा निधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. वितरीत झालेल्या निधीतून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होणार असून, याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. -रेखा कारेकर, शिक्षण सभापती, जि. प. चंद्रपूर