- प्रा. अशोक डोईफोडे ( चंद्रपूर)
पारंपरिक फवारणी यंत्राने फवारणी करताना, शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. यात शारीरिक कष्ट तसेच आरोग्याचा प्रश्नही असतो. या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या (एम.सी.व्ही.सी.) प्रा. माधुरी पेटकर यांनी टाकाऊ साहित्यापासून ‘आधुनिक फवारणी यंत्र’ तयार केले आहे. जे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरत आहे. या यंत्राला पाठीवर किंवा खांद्यावर घ्यायची गरज नाही.
पारंपरिक फवारणी यंत्र सतत खांद्यावर घेऊन राहावे लागत असल्यामुळे खांदे निकामी होणे, मणक्याचा त्रास होणे, शरीरावर वजन येत असल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. औषधीची टँक पाठीवर आणि नोझल नाकाजवळ असल्यामुळे घातक रसायने नाकाद्वारे शरीरात जातात. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून, काही जणांचा तर मृत्यूही झाला आहे. याशिवाय पारंपरिक फवारणी यंत्राची किंमतही अधिक आहे. साधा पंप दोन हजार रुपये, तर इलेक्ट्रिक पंपची किंमत तीन हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे हे पंप शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
प्रा. पेटकर यांनी शोधलेल्या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर किंवा खांद्यावर ताण पडत नाही. शारिरीक कष्टही घ्यावे लागत नाही. टँक आणि नोझल मानसापासून लांब अंतरावर असल्यामुळे घातक रसायने शरीरात जात नाही. यात विशेष बाब अशी की, या यंत्रामध्ये एकापेक्षा जास्त नोझल वापरलेले असल्याने एकाच वेळी चार ते सहा सरींची सोयीस्करपणे फवारणी केली जाऊ शकते.. तसेच हे यंत्र तयार करण्यासाठी जास्तीत जास्त तीन हजार रुपये खर्च येतो. कमी किंमतीत वेळ व श्रम वाचविणारे हे यंत्र असून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.