चंद्रपूर : आजकाल कामाचा व्याप वाढल्याने व्यक्ति मानसिकदृष्ट्या तणावात असतात. कामाचा व्याप, नको तो ताण, मोबाईल, संगणकवर बसून काम करणं, दिवसभर एकाच स्थितीत बसून राहणं यामुळे शरीरातील दुखणं वाढतं. त्यानंतर तिथेच जेवण आणि झोप हा प्रकार आजघडीला खूप वाढला आहे. याचा परिणाम थेट आपल्या तब्येतीवर होतो. अंगदुखी, डोळ्यांची जळजळ, थकवा, पाय दुखणे, गुडघेदुखी आदि समस्या जडतात.
आधुनिकतेबरोबर प्रत्येकाच्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले आहेत. जवळच्या दुकानात जायचे असो, की शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की सर्व जण भुर्रर जातात. परिणामी चालण्याची सवयच आता मोडत आहे. कधी चालायची वेळ आलीच, तर दम लागतो, ठेचा लागतात, असे अनेकजण दिसतात. चालण्याची सवय नसल्याने अनेकांना नको त्या वयात गुडघे तसेच कंबरदुखीची व्याधी सुद्धा लागली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन, घरी कितीही गाड्या असल्या तरीही, चालण्याची सवय ठेवणे अत्यावश्यकच आहे.
सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे जो तो स्पर्धा करीत आहे. यामध्ये पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे. चालण्याचा सराव नसल्याने थोडे जरी अंतर चालले तरी, अनेकांना दम लागत आहे. त्यामुळे प्रकृती बिघडली की काय? असे प्रत्येकांना वाटते. एखाद्यावेळी गाडी बंद पडली, तर मग मोठीच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने चालण्याची सवय ठेवावीच. यामुळे स्वत:चे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
या कारणांसाठी होतेय चालणे...
ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ - सायंकाळ
महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत
पुरुष : गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केलीच तर शतपावली
तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत
हे करून बघा...
एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा. कुठेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.
...म्हणून वाढले हाडांचे आजार
प्रत्येक घरात आता दुचाकी आली आहे. काहींकडे चारचाकी वाहन आहे. बाजारात जाणे असो, की किराणा आणण्यासाठी, गाडी काढली की झटपट जाण्याची मानसिकता सध्या वाढली आहे. चालत भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अपार्टमेंटमध्येही वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस ही चालण्याची सवय मोडत आहे.
असा होतो फायदा...
रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख होते. ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकांना गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे यांचीही माहिती नसते. पायी फिरताना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते. सोबतच शारीरिक व्यायामसुद्धा होतो.
चालण्याची सवय नसल्याने...
पायांच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतीच ही क्रिया मर्यादित राहते. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक व्यायाम होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल.
- डाॅ. विनोद मुसळे
अस्थिरोग तज्ज्ञ, चंद्रपूर