लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदींचे सरकार १५/२० लोकांसाठीच काम करीत आहे. सामान्य जनतेशी मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही. हे सरकार लोकांच्या खिशातून पैसे काढून अमीर लोकांच्या घरात भरत आहे अशी घणाघाती टीका भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नांदेड (चंद्रपूर ) येथे सरकारवर केली.प्रसिद्ध धानसंशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे आले होते. दादाजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यांनंतर राहुल गांधीनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंचावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश, अशोक गहलोत, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ब्रम्हपुरीचे आमदार व प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार, प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, नांदेडच्या सरपंच दुर्गा कामडी व दादाजी खोब्रागडे यांचा मुलगा व सून उपस्थित होते.सरकारवर हल्ला चढवतांना राहुल गांधी म्हणाले की,कोणत्याही नेत्याचे काम रस्ता दाखविण्याचे असते पण मोदी नुसते खोटे बोलण्यात व्यस्त आहेत. हे आता लोकांच्या लक्षात आहे म्हणूनच शेतकरी व युवकांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना मोदी सरकारने मदत केली यांनी किती लोकांना रोजगार दिला. अशीच मदत दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मिळाली असती तर त्यांनी ५० हजार लोकांना रोजगार दिला असता असेही राहुल गांधी यांनी सागर खोब्रागडे यांनी विचारलेल्या प्रश्नादरम्यान सांगितले .रामकृष्ण देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, शेतकरी संकटात आहे. तो घाबरला आहे.शेतकऱ्यांना हिंमत देणे गरजेचे आहे. दादाजींच्याबद्दल मला माहिती मिळाली. मला गरिबांबद्दल कळवळा आहे म्हणून मी येथे आलो. आमचे सरकार सत्तेवर येताच पंजाब, कर्नाटक मधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले .मोदींची मार्केटिंग १५/२० करतात. या लोकांना मोदींनी सांगितले होते की मी सत्तेवर आलो तर मी तुम्हाला कर्जमुक्त करेल. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार नाही. दादाजी खोब्रागडे यांच्यासाठी हे सरकार नाही असेही राहुल यांनी अमिषा रोकडे या महिला शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगितले .यावेळी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही थोडक्यात मार्गदर्शन झाले. यावेळी मंचावर आमदार यशोमती ठाकूर , माजी खासदार नरेश पुगलीया, मारोतराव कोवासे, माजी आमदार अविनाश वारजूकर, आनंदराव गेडाम, अतुल लोंढे, जि.प.चे माजी अध्यक्ष सतिश वारजूकर, ब्लाक काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रफुल खापर्डे , पंजाबराव गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले तर संचालन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले.