चंद्रपूर: जेवणासाठी बोलवायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या मोठ्या आईच्या बहिणीच्या पतीने विनयभंग केल्याची घटना सोमवारी चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीवर कलम ३५४, ३५४ (अ) (१), ३४२ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नीरज सुकलपालसिंग चौधरी (४५), रा. चंद्रपूर, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही मूळची दिल्लीची आहे. तिचे आई- वडील लहानपणीच वारले. त्यामुळे ती चंद्रपूर येथे आपल्या मोठ्या आईकडे वास्तव्याला आली. तिच्या मोठ्या आईची बहीण व तिचा नवरा नीरज चौधरी हा उत्तर प्रदेशातील आहे. मागील काही महिन्यांपूर्वी तो चंद्रपूरला वास्तव्यास आला. तोही त्याच परिसरातच आपल्या पत्नीसह राहू लागला. सोमवारी पीडित मुलीच्या मोठ्या आईच्या घरी पाहुणे आल्याने त्यांनी जेवणाचा बेत आखला होता. पीडित मुलगी नीरज चौधरीला जेवण करायला बोलवायला गेली. यावेळी त्याने तिचा हात धरून विनयभंग केला. तिने कशीबशी आपली सुटका करून आपली आपबीती मोठ्या आईकडे कथन केली. त्यांनी लगेच रामनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. रामनगर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर यांनी नीरज चौधरी याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर करत आहेत.