चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे तसेच सार्वजनिक कार्यक्रम तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थीही कोरोना दहशतीमध्येच शाळेत जात आहे. एवढेच नाही तर ते आई-वडील तसेच कुटुंबीयांची काळजी घेत असून, सॅनिटायझर, मास्क लावण्यास वारंवार सांगत आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक पत्र पाठवून स्वत:सह आई-वडील, कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये ३४ बाधितांची भर पडली आहे. तर १८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिवसागणिक हा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा कोरोना संकटाच्या दहशतीत वावरत आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन होते की, काय यासंदर्भातही आता चर्चा रंगू लागल्या आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून ५ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी घराबाहेर पडत आहे. या संकटामध्ये आपले पाल्य सुरक्षित राहणार की नाही याची काळजी पालकांना आहे. तर एकूणच वातावरण बघता विद्यार्थीही आता सतर्क झाले असून, आई, बाबा, कुटुंबीयांची ते काळजी करीत आहे. वारंवार सॅनिटायझर, मास्क वापरण्याविषयी कुटुंबीयांना सांगत असल्याचे एकूणच चित्र बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३ हजार ४७१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील २२ हजार ८९३ जण कोरोनामुक्त झाले असून, ३९७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांची काळजी वाढली आहे.
कोरोना संकटामुळे आम्ही आई-वडिलांना तसेच कुटुंबातील सर्वांना मास्क, सॅनिटायझर लावण्याबाबत सांगत आहो. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, लग्नसमारंभातही जाऊ नका म्हणून सांगतो. शिक्षकही आम्हाला मास्क लावण्यासंदर्भात वारंवार सांगतात.
-खुशी गणपत देवाळकर
वर्ग ७ वा, वेंडली
-
आम्ही वारंवार हात धुतो. शाळेत आल्यानंतरही सॅनिटायझर लावतो. आई, वडील तसेच घरच्यांना वेळोवेळी हात धुण्यास सांगतो. सॅनिटायझर, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका म्हणून सांगतो. आजार होऊ नये म्हणून काळजी घेण्यासंदर्भातही कुटुंबीयांसोबत चर्चा करतो.
अक्षरा मंगल देवाळकर
वर्ग ७ वा, वेंढली
--
सर्दी, ताप, खोकला आला तर डाॅक्टरकडे जा, सॅनिटायझर लावा, मास्कचा वापर करा याबाबत आम्हाला शाळेत सांगतात. आम्ही पण आई-वडिलांसह कुटुंबीयांना कोरोना संकट टाळण्यासाठी सॅनिटायझर लावण्याबाबत सांगतो. शाळेत येण्यापूर्वी सॅनिटायझर लावतो.
-रूद्र दीपक लडके
वर्ग ५ वा, चंद्रपूर
----
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्यासंदर्भात सांगण्यात येत आहे. आम्ही पण आई-वडील तसेच घरच्यांना काळजी घेण्याचे सांगतो. मास्क, सॅनिटायझर लावूनच बाहेर जाण्याबाबत तसेच गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये म्हणून सांगतो.
-खुशी विनोद लांडे
वर्ग ७ वा, रामपूर
--
शाळेमध्ये येताना आम्ही मास्क तसेच सॅनिटायझर लावतो. शिक्षकही यासंदर्भात वारंवार सांगतात. आम्ही कुटुंबीयांना याबाबत सांगून बाहेर जाण्यापूर्वी सॅनिटायझर लावण्याबाबत सांगतो.
-युवराज भास्कर जुनघरी
वर्ग ५ वा, गोवरी
--
मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. आम्ही संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाने लावून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार वावरत आहे. कुटुंबीयांनाही याबाबत वारंवार सांगत आहे.
-तनवी सुधीर झाडे
वर्ग ८ वा. नांदाफाटा
कोट (वरचा अधीकारी)
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे.फिजिकल डिस्टन्स, मास्क लावणे, वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे असून, सर्वांनी त्रिसूत्री पाळणे महत्त्वाचे आहे. लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.
-विद्युत वरखेडकर
अप्पर जिल्हाधिकारी, चंद्रपूर