लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महानगरच्यावतीने विधीमंडळ लोकलेखा समितीप्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आयएमए सभागृहात ‘शिवगान स्पर्धा २०२१’ उत्साहात पार पडली. वैयक्तिक गीत स्पर्धेत चंद्रपूरची मोनाली यादव प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली तर सांघिक स्पर्धेत पोंभुर्णा येथील जिवा शिवा प्रतिष्ठानने बाजी मारली. मोनाली यादव व शिवा जिवा प्रतिष्ठानला अंतिम फेरीत गायनाची संधी मिळाल्याने मोनालीचा आवाज आता अजिंक्यतारा गडावर निनादणार आहे.
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. वैयक्तिक गायन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मोनाली यादव, द्वितीय पुरस्कार साईनाथ गुरनुले, तृतीय पुरस्कार रश्मी हिवरे व सोनाली आगडे यांना विभागून देण्यात आला. सांघिक गायनात प्रथम शिवा जिवा प्रतिष्ठान संघ, पोंभुर्णा, द्वितीय जिजाऊ प्रतिष्ठान व तृतीय क्रमांक मूल येथील कुमोद संवादिनीला मिळाला. दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंतीला सातारा येथील अजिंक्यतारा गडावर शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तीगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश होता.
विजेत्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समितीचे सभापती रवी आसवाणी, उपमहापौर राहुल पावडे, झोन सभापती राहुल घोटेकर, परीक्षक अनंता धुम्रकेत, मंगेश देऊळकर, संदीप कपूर, चंद्रपूर महानगर सांस्कृतिक प्रकोष्ठचे संयोजक जगदीश नंदूरकर, सहसंयोजक हेमंत गुहे आदी उपस्थित होते. रंगकर्मी अजय धवणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी अतुल येरगुडे, प्राची नांदलवार, अंकिता देशट्टीवार, प्रणाली कवाडे, विघ्नेश्वर, देशमुख, सोनाली कवाडे आदींनी सहकार्य केले.