केंद्रीय वित्त राज्यमंत्री : अर्थसहाय्यात बँकांची टाळाटाळ नकोचंद्रपूर : बुलतेदार आणि कारागिरांच्या कला उपजत असतात. त्यांना कला कुणी शिकवाव्या लागत नाहीत. मात्र योग्य अर्थसहय्याअभावी ते व्यवसायात मागे पडतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून देशाची अंतर्गत अर्थव्यवस्था सक्षम करण्ळासाठी पंतप्रधान मुद्रा योजना आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केले आहे.स्थानिक चांदा क्लब मैदानावर सोमवारी रोजगार व स्वयं रोजगार संकल्प, राष्ट्रीयकृत बँका व विविध शासकीय संस्थांच्या सहकार्याने पंतप्रधान मुद्रा लोन योजनाचा लोन मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना शामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, माजी मंत्री संजय देवतळे, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, विजय राऊत आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अर्जुनराम मेघवाल म्हणाले, देशात वित्तीय साक्षरता हळूहळू पुढे सरकत आहे. चंद्रपुरातील या मेळाव्यामुळे आपल्या वित्त विभागाचे काम सोपे झाले आहे, अशा शब्दात त्यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले, व्यवसायासाठी गरजुंना कर्ज देणाऱ्या बँकांचा सन्मान करा, कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्यांची दखल घ्या. गरीब माणसे कर्ज वेळेवर फेडतात, याची हमी पंतप्रधानांनी घेतली आहे. त्यामुळे पारंपारिक व्यावसायिकांना कर्ज देताना जामीनदाराची गरज भासणार नाही.या योजनेअंतर्गत देशात आजवर पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या एक कोटी १६ लाख लोकांना ४५ हजार ५१४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा लोन योजनेत कृषी कर्जाचा समावेश करण्यात आला असून भविष्यात शहरी जनतेलाही सहभागी केले जाईल.अध्यक्षीय भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांशी योजना आहे. सर्वसामान्य, कष्टकारी जनतेची गरज ओळखून ही योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्व जनतेला व्हावा असे त्यांचे स्वप्न आहे. अधिकाधिक गरजुंना बॅकांच्या सहाय्याने कर्ज मंजूर करुन त्याची पुर्तता करा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हातील २४ बँकांनी सहा हजार ४९१ गरजु लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यात चार हजार ३३४ शिशु लोन, एक हजार ७७८ लोकांना किशोर लोन तर ३७८ लोकांना तरूण लोन दिल्याची माहिती त्यांनी दिली.प्रारंभी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते पारंपारिक व्यवसायिकांना कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आहे. खा. विकास महात्मे व महापौर राखी कंचलार्वार यांचीे समयोचीत भाषणे झालीत.मेळाव्यात विविध राष्ट्रीयकृत २४ बँकांनी स्टॉल लावले होते. पारंपारिक व्यावसायीकांकडून येथे अर्ज भरुन घेण्यात आले. विविध बॅकांच्या अधिकाऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रस्ताविक आ. नाना शामकुळे यांनी केले, तर आभार राजेश मुन यांनी मानले. संचालन नासीर खान यांनी केले. पारंपारिक व्यवसायिक कारागिर, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी महिला व्यवसायिकांची लक्षणिय उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
देशातील अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेसाठी मुद्र्रा लोन योजना
By admin | Published: September 20, 2016 12:38 AM