चिमूर: तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले. तहानलेल्यांना पाणी देण्याची भावनाच लुप्त झाली असे नाही तर पाणपोई कमी होण्यास बॉटल संस्कृती एक कारण ठरत आहे. जीवनात पाण्याला महत्त्व आहे. शास्त्रात पाण्यालाच जीवन म्हटले आहे. पाप- पुण्य जरी कथेच्या गोष्टी असल्या तरी, तहानेने व्याकूळ झालेल्यांला पाणी मिळाल्यास त्याची तृष्णा भागून त्याला मिळणारी तृप्ती ही काही कोण्या पुण्यापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात वाढत असलेल्या पार्यात कुणालाही कुठेही पाण्याची गरज भासते. यामुळे पूर्वी रस्त्यावर मोठ्या चौकात व रहदारी असलेल्या भागात अनेक ठिकाणी पाणपोई लावल्या जात होत्या. मात्र आता पाणपोई दिसेनाशा झाल्या आहेत. भर उन्हात जर तहान लागली तर ती भागविण्यासाठी बिसलरी बॉटल विकत घेऊनच तहान भागविण्याची वेळ आज आली आहे. यात ज्यांच्या खिशात पैसा आहे त्यांच्याकरिता हे शक्य आहे. मात्र चिमूर बाजारहाटाकरिता आलेल्या बाहेर गावातील गरजवंताना हे अडचणीचे ठरत आहे. बॉटल संस्कृती वाढल्याने पाणपोई हटविली जात आहे. पाणपोई कमी होण्यामागे वाढती बॉटल संस्कृती एक कारण आहे. शिवाय ठिकठिकाणी मिनरल वॉटर, पाणी पाऊच मिळत असल्याने तहानलेल्यांना त्या मिळत आहेत. मात्र यासाठी पैसा मोजावा लागत आहे.. (तालुका प्रतिनिधी)
तहान भागविण्यासाठी मोजावे लागते पैसे
By admin | Published: May 23, 2014 11:44 PM