शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यात रोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून तालुक्यातील मरेगाव आकापूर, चिमढा परिसरात औद्योगिक विकास महामंडळ यांनी १९४.२६ हेक्टर जागेत भूमी अधिग्रहण करून शासनाने ४७ भूखंड पाडले व भूखंड उद्योगाकरिता उपलब्ध करून दिले. उपलब्ध भूखंडावर सुरू असलेल्या कंपन्यांनी आपल्या हद्दीतील ग्रामपंचायतीला कर देणे बंधनकारक आहे. मात्र कंपनीने निर्मितीपासूनच ग्रामपंचायतच्या कर मागणी पत्राला केराची टोपली दाखवत आजतागायत कराचा भरणा केला नाही.
परिणामी औद्योगिक विकास महामंडळाकडे लाखो रुपयांचे गृह कर थकले असून, ग्रामविकासात अडचणी निर्माण होत आहेत. औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवरील काही कंपन्या मरेगाव तर काही आक्कापूर ग्रामपंचायत अंतर्गत येतात मरेगाव ग्रामपंचायतचा जवळपास ४७ लाख रुपये तर आक्कापूर ग्रामपंचायतचे जवळपास २० लाख रुपये संबंधित कंपन्यांनी कर थकविला आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी संबंधित कंपनीकडे कराचा भरणा करण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कंपन्यांनी गृहकर थकीतच ठेवला आहे. मरेगाव, आक्कापूर या दोन्ही गावात एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
महामंडळही उदासीनसन २०१९ च्या परिपत्रकानुसार संबंधित कंपनीकडून कर वसुलीचे अधिकार औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. त्यातील ५० टक्के रक्कम औद्योगिक विकास महामंडळ स्वतः परिसरातील सुविधा तर ५० टक्के निधी थेट ग्रामपंचायतला देण्याची तरतूद आहे. मात्र कर वसुलीसाठी औद्योगिक विकास महामंडळ उदासीन आहे. त्यामुळे कर वसुली होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
"कराचे मागणी बिल व पत्रव्यवहार दरवर्षी सुरू असून, गृहकर देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत आहे. लाखो रुपये थकल्याने ग्राम विकासावर परिणाम पडला आहे." - बी. टी. बारसागडे, सचिव ग्रामपंचायत मरेगाव