घुग्घुस : शुभमचे अपहरण व त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार २७ दिवसांनी पुढे आल्याने पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त करण्यासाठी रविवारी रात्री रामनगर मंदिरापासून गांधी चौकापर्यंत घुग्घुसवासीयांनी कॅण्डल मार्च काढून प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीचा निषेध करण्यात आला.
मृत शुभमला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविवारी सायंकाळी वेकोलि वणी क्षेत्राच्या येथील रामनगर कामगार वसाहतमधील राममंदिरानजिक मोठ्या संख्येत महिला, लहान मुले व पुरुष गोळा झाले. तिथे दोन मिनिटे मौन पाळून शुभमला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हातात पेटलेल्या मेणबत्या व मशाली घेऊन कॅण्डल मार्च राजीव रतन चौक, नवीन बसस्थानक चौक, जुना बसस्थानक मार्गे गांधी चौक येथे धडकला. तिथे पोलीस प्रशासन हाय हाय, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी द्या, अशी प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. गांधी चौकात शुभमच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आक्रोश मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रण पथक बोलाविले होते तसेच पोलीस बंदोबस्त ठेवला होता.