संजय अगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : तळोधी बा. पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे ओवाळा येथील शंभराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हगवन व उलटीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यातील गंभीर रुग्णांना तळोधी व नागभीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय ओवाळा येथे तात्पुरते शिबिर उभारून रुग्णांवर उपचार केला जात आहे.सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई सुरू आहे. ओवाळा येथील नागरिक गावातीलच एका विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. हे पाणी अचानक दूषित झाल्याने गावातील महिला व पुरूषांना हगवण व उलटी, मळमळचा त्रास होऊ लागला. अनेक रुग्ण गॅस्ट्रोने बाधित झाले आहेत. अनेकांनी खासगी व प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घेतले. परंतु रुग्णांची संख्या सतत वाढत जात असल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या गावातील शंभराहून अधिक लोकांना गॅस्टोची लागण झाली आहे. याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. आरोग्य विभागाने तत्काळ गावातील ग्रामपंचायतीमध्ये शिबिर उभाारले. डॉ. राजेश नाडमवार यांच्या नेतृत्वात रूग्णांची तपासणी करून औषध उपचार केला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत परिचारिका व्ही. एस. मेश्राम, एस. एस. उईके, आरोग्य सहाय्यक डि. जी. पेंदाम, वाहन चालक रवी शेंडे, आशा वर्कर ममता रामटेके, ओवाळा येथील सरपंच प्रेमिला तोरे, ग्रामसेवक ए. एम. आदे, उपसरपंच प्रविण भेंडाळे उपस्थित होते.गंभीर अवस्थेतील रुग्णांना तळोधी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले आहे. डॉ. स्वप्नील कामडी यांच्या मार्गदर्शनात रूग्णांवर उपचार सुरू आहे. येथे संगिता निरंजन मोहुर्ले (२५), आचल कास्तवार (१६), उषा मोहुर्ले (३०), महानंदा मोहुर्ले (३५), कुसूम गेडाम (६०), गुरूदास शेंदरे (४०), धनराज रामटेके (४५), अल्का रामटेके (३५), कमल नैताम (६५), सोनी शास्त्रकार (२४), बकाराम शेंडे (५५) या रूग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, जि. प. सदस्य संजय गजपुरे व जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांनी रुग्णांची भेट देवून आरोग्य विभागाला गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले. विशेष म्हणजे काही रुग्णांना नागभीड येथे दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.विहिरीला कुंपणगावातील लोकांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण झाली, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असे ठरवून विहिरीच्या सभोवताल काटेरी कुंपण करण्यात आले. सदर विहीर तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.गावात टँकरने पाणी पुरवठाओवाळा या गावात गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे येथे पिण्याया पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या विहिरीचे पाणी नागरिक पित होते, ती विहीर बंद करण्यात आली आहे. जनतेला पाणी पुरवविण्यासाठी नागभीड येथून टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे या भागात टँकरने पाणी उपलब्ध होताच पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. ओवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते मुखरू उईके व माजी सरपंच सुभाष मोहुर्ले यांनी टँकरने उपलब्ध झालेल्या पाण्याचे योग्य पद्धतीने वाटप करून जनतेची तहाण भागविण्याचे कार्य केले.
ओवाळ्यात शंभराहून अधिक गॅस्ट्रोचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:49 AM
तळोधी बा. पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे ओवाळा येथील शंभराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हगवन व उलटीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देगावात लावले शिबिर : गंभीर रुग्णांवर तळोधी, नागभिडात उपचार, दूषित पाण्यामुळे साथ