रस्त्याची दुरुस्ती करावी
चंद्रपूर: जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्याचे सर्वेक्षण करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. औद्योगिक शहर म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे येथे परिसरातून मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. मात्र खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
वीज पुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : तालुक्यातील काही गावात विजेचा सतत लपंडाव सुरू असून व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. याकडे वीज वितरणने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : तालुक्यात दूरसंचार विभागाची इंटरनेटसेवा ढीम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. इंटरनेटसेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
कर्ज प्रस्ताव मंजूर करावे
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला असून अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ्यांची दुकाने लावली जात आहेत. त्यामुळे मनपा तसेच अन्न, औषध प्रशासनाने कारवाई सुरू करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पावसाचा बांधकामाला फटका
चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने काम बंद होते. मागील काही दिवसापूर्वी शिथिलता दिल्यानंतर काम सुरु करण्यात आले. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खोदकाम केल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मातीने रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील फांद्या जीवघेण्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही रस्त्यावरील झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरत आहेत. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-बेरात्री ही कुत्री अंगावर धावून येत असल्याने रात्रपाळीमध्ये कामाला जाणाऱ्यांची मोठी फजिती होत आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.