शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : उघड्यावर शौचाला बसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हगणदारीमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार घरोघरी शौचालये बांधण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले. मात्र, ग्रामीण जनतेची मानसिकता बदलली नसल्याने आजही ग्रामीण भागात बाहेर शौचास बसत असल्याचे दिसते.
मात्र आता ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने बाहेर शौचास जाणे जिवावर बेतणारे ठरत असल्याने भीतीपोटी का असेना, शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात शौचालयाचा वापर होत नसल्याने गावाशेजारील रस्त्यावर घाण पसरली आहे. त्यामुळे शासनाच्या हगणदारीमुक्तीचे स्वप्न नागरिकांच्या उदासीनतेमुळे भंगत असल्याचे चित्र दिसत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने, तसेच विशेषतः महिलांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१४ पासून केंद्र शासनासोबतच राज्य शासनानेदेखील याला पाठबळ दिले. त्यामुळे शौचालयाचे महत्त्व जनतेला कळले. पंचायत समितीमार्फत शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमलात आणला गेला. विविध पुरस्कार मिळत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधीदेखील कामाला लागले.
'नऊ दिवस नवलाईचे' या म्हणीप्रमाणे काही दिवस याचा परिणाम जनमानसात टिकून राहिला. हगणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. मात्र, पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण तालुका, जिल्हा हगणदारीमुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हगणदारीमुक्त गाव रेखांकित करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या या हगणदारीमुक्त गावाची संकल्पना आजही तालुक्यात साकारली नाही.
वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी तरी करा शौचालयाचा वापर ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गावाकरिता शौचालय बांधले. मात्र, वापर टाळला. जनतेने अनुदान मिळते म्हणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, वापर काही मोजक्या गावातच केला जात असल्याचे दिसून आले. आता ग्रामीण भागातील जनतेला शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता बदलण्याची शक्यता बळावली आहे. कारण ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असल्याने शौचास बाहेर जाणे टाळून घरी बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले टाळण्यासाठी या निमित्ताने का असेना शौचालयाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.