लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यातील बहुतांश शाळेत महिला शिक्षिकाच नसल्याचे वास्तव आहे.
मुली आपला त्रास, समस्या या महिला कर्मचारी किंवा शिक्षिकांकडे मनमोकळेपणाने सांगू शकतात. मात्र, त्याच समस्या पुरुष कर्मचाऱ्यांकडे सांगताना त्या काहीशा संकोच करतात. त्यामुळे शाळेत एकतरी महिला कर्मचारी असावी, अशी अपेक्षा पालकवर्गांकडून होत असतानाही जिल्ह्यातील बहुतांश शाळेत महिला शिक्षिकाच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कसे होणार मुलींचे समुपदेशन? मुली या मुळातच लाजऱ्या असतात. त्या सहजासहजी आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगत नाहीत. वर्गशिक्षिका या वर्गातील सर्वच मुलींच्या जवळच्या असतात. त्याच मुलींच्या समस्या समजून घेऊन समुपदेशन करू शकतात. मग शाळेत महिला शिक्षिकाच नसेल तर समुपदेशन कोण करणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात पुरुष शिक्षकांमागे महिला शिक्षिका कमी जिल्हा परिषदेच्या, खासगी, विनाअनुदानित आदी अडीच हजारांच्या वर शाळा आहेत. खासगी शाळेत महिला शिक्षिकांची संख्या बऱ्यापैकी असली तरीही शासकीय शाळेत महिला शिक्षिकांची संख्या कमी असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.