विनायक येसेकर
भद्रावती : जन्मदात्या मातेने स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला संचारबंदीच्या काळात काही कामधंदा करीत नाही म्हणून घरून हाकलून दिले. दु:खी झालेल्या त्या मुलाने आपली आपबीती सांगितल्यानंतर भद्रावती येथील पोलीस शिपाई शशांक बद्दामवार यांनी त्याच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून आश्रय दिला आहे.
रितिक नाव असलेला हा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथील रहिवासी आहे. पोलीस शिपाई शशांक बद्दामवार हे गस्तीवर असताना त्यांना बसस्थानक परिसरात रितिक रडत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारणा केली. तो काही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हता. परंतु त्याला वारंवार विचारणा केली असता प्रथम त्याने मला भूक लागली असल्याचे सांगितले. त्याला जेवण दिल्यानंतर त्याने आपली आपबीती सांगितली.
त्याच्या आईचे माहेर भद्रावती असून, ती फुकटनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्या आईचे लग्न यूपी येथे झाले. दोन वर्षे ती सासरी राहिल्यानंतर दोन वर्षाच्या मुलाला सोडून ती भद्रावती येथे परत आली. वडील व्यसनी असल्याने रितिकचा सांभाळ वडिलांच्या आईने केला. त्यानंतर त्याला समज आल्यानंतर तब्बल सोळा वर्षांनंतर तो आईचा शोध घेत भद्रावतीत आला. मात्र इकडे त्याच्या आईने दुसरे लग्न केले होते. रितिकला काही दिवस स्वतःजवळ ठेवल्यानंतर त्याच्या आईने चालू असलेल्या संचारबंदीमध्ये कामधंदा का करत नाही, तुला फुकट पोसणार नाही, असे म्हणून त्याला घरातून हाकलून लावले. त्याने बसस्थानक गाठून उपाशीपोटी एक दिवस काढला. हा प्रकार पोलीस शिपाई शशांक बद्दामवार यांना कळताच त्यांनी स्वखर्चाने या मुलाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याने त्या निरागस मुलाच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.