विरूर स्टेशन (चंद्रपूर) : कवीटपेठ परिसरातील अर्जुन आत्राम यांच्या शेतात असलेल्या विहिरीत १८ फेब्रुवारीला एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिला तेलंगणा राज्यातील असल्याचा अंदाज घेत, या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तपास सुरू केला. सोमवारी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. या प्रकरणात मृत महिलेच्या आईनेच सुपारी देऊन मारल्याचे उघडकीस आले. मृताच्या आईसोबत मुंडीगेट येथील एका दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे.
राजुरा तालुक्यातील विरूरलगत कवीटपेठ शेतशिवारात असलेल्या विहिरीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान मृत महिला कोंडापल्ली विजयवाडा येथील असल्याचे व तिचे नाव सैदा बदावत असल्याचे समजले. शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सैदा बदावत हिच्या आईला ठाण्यात बोलाविले व जबाब नोंदविला. यात विरूर परिसरातील मुंडीगेट येथील सिन्नू अजमेरा हा तिचा नातेवाईक असल्याचे समजताच, पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. लगेच हैदराबाद येथे जाऊन सिन्नूला आणण्यात आले. सिन्नूची कसून चौकशी करताच, त्याने गुन्हा कबूल केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार माणिक वाग्धरकर, दिवाकर पवार, मल्लय्या नर्गेवार, विजय मुंडे, सविता गोनेलवार, ममता गेडाम यांनी केली.
अशी आहे हत्येमागील पार्श्वभूमी
मृत सैदा हिचे दहा वर्षांपूर्वी एकासोबत लग्न झाले होते. तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. नंतर ती नवऱ्याला सोडून राहत होती. परंतु, चरित्रहीन कामे करीत असल्याने तिचा आई लचमी हिच्याशी नेहमी वाद होत होता. दरम्यान, सैदा चार महिन्यांची गर्भवती होती. पती नसताना पोटातील बाळ कोणाचे याबद्दल आईलाही काहीच सांगत नव्हती. बदनामीच्या भीतीने सैदाला मारून टाकण्याचे आई लचमी हिने ठरविले.
त्यानुसार सिन्नू व त्याची पत्नी शारदा यांना आपबीती सांगून, तुमच्या गावाकडे नेऊन सैदाला मारून टाकून पुरावा नष्ट करा असे सांगून ३० हजार रुपये देण्याची कबुली झाली. नियोजनानुसार पाच हजार घेऊन सैदाला गर्भपात करण्याच्या निमित्ताने सिन्नू व शारदा यांनी मुंडीगेटला आणले आणि १८ फेब्रुवारीला कवीटपेठ येथील अर्जुन आत्राम यांच्या शेतातील विहिरीत सैदाला ढकलून दिले. पोलिसांनी आई लचमी, सिन्नू अजमेरा व शारदा अजमेरा यांना अटक केली आहे.