ब्रह्मपुरी : शुक्रवारी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विधानसभा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौकात मोटरबाईक धक्का व चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देश कोरोना महामारीने भरडला गेलेला आहे. त्यामध्ये लाखो, करोडो लोकांचे रोजगार बुडाले आहे. अनेक छोट्या-मोठ्या कामगारांचे काम ठप्प झाले असून, अनेक छोटे-मोठे उद्योगधंदेसुद्धा बंद झालेले आहेत. एकंदरीत संपूर्ण भारतात आर्थिक मंदी निर्माण झाली असतानासुद्धा आपल्या देशात पेट्रोल-डिझेल, गॅस आणि वीज दर दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहेत. असे असतानासुद्धा देशातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील महागाई उच्चांकावर पोहोचली आहे. याविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, विधानसभा ब्रह्मपुरीच्या वतीने शुक्रवारी मोटरबाईक धक्का मारो आंदोलन तथा महिला आघाडीच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्रह्मपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी असे मोटारगाड्यांना धक्का देत मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे निदर्शने करून एसडीओ ब्रह्मपुरी यांच्यामार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पूनम घोनमोडे, सुखदेव राऊत, विवेक मेश्राम, राजेंद्र मेंश्राम, रोशन मेंढे, मार्कंड बावणे यांनी केले. संचालन हंसराज रामटेके तर आभार मिताली आंबोणे हिने मानले. भारती जनबंधू, शिल्पा मेश्राम किशोर प्रधान, अपेक्षा मेंढे, पल्लवी मेश्राम व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले.