नागभीड : नागभीड येथे बसस्थानकांचा कचरा झाला आहे. एकाच गावात चार बसस्थानक असलेले नागभीड कदाचित एकमेव शहर असावे. या बसस्थानकांचा लोकांना त्रासही होत आहे आणि म्हणूनच विश्रामगृहात बसस्थानक थाटून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ग्रामीण रुग्णालयाजवळील बसस्थानक परिसरात उभारावे, अशी मागणी होत आहे.अगोदर नागभीड येथे राज्य परिवहन मंडळाचे जुन्या बसस्टँडवर बसस्थानक होते. त्यानंतर येथे प्रशस्त अशा बसस्थानकाची मागणी करण्यात आली. त्यासाठी आंदोलनसुद्धा करण्यात आले. त्याचे फलीत म्हणून ग्रामीण रुग्णालयाजवळ बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. पण आज हे बसस्थानक अडगळीत पडले आहे. हे बसस्थानक प्रवाशांना गैरसोयीचे असल्याने राममंदिर चौक हेच प्रमुख बसस्थानक बनले. येथूनच प्रवाशांची अवागमण सुरु झाली. मात्र कालंतराने या ठिकाणी मोठीच गर्दी होऊ लागल्याने आणखी येथील टी- पार्इंट चौकात एका बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. आज नागभीड येथे जुना बसस्टँड, टी पार्इंट, राममंदिर चौक आणि अडगळीत पडलेले ग्रामीण रुग्णालयाजवळील बसस्थानक असे चार बसस्थानक आहेत. या चारपैकी जुना बसस्टँड वगळता तीन बसस्थानकांचे विसर्जन करुन सा.बां. विभाग (विश्राम गृह) बसस्थानकाची निर्मिती केल्यास प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सोयीची होऊ शकते आणि ही जागा बसस्थानकाच्या दृष्टीने अतिशय योग्यही आहे.योगायोगाने नागभीड येथे सा.बां. विभागाचे विभागीय कार्यालयसुद्धा मंजूर झाले आहे. येत्या १ मे रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. या कार्यालयासाठी निधीही मंजूर झाला आहे.या कार्यालयाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. अडगळीत पडलेल्या बसस्थानक परिसरात सा.बां. विभागाच्या दृष्टीने जागा उपलब्ध असून या ठिकाणी सा.बां. विभागाच्या विभागीय आणि उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम करुन सा.बां. विभागाच्या (विश्राम गृह) जागेवर बसस्थानकाची निर्मिती केल्यास हे सा.बां. विभाग आणि बसस्थानकाच्या दृष्टीने सोयीचे होऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)मी चार वर्षापूर्वीच ही मागणी केली होती. विश्रामगृहाची जागा बसस्थानकासाठी योग्य आहे आणि अडगळीत पडलेल्या बसस्थानकाची जागा सा.बां. विभागाच्या कार्यालयांसाठी योग्य आणि आणि लोकांसाठीसुद्धा सोयीची आहे. आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या माध्यमातून मी पुन्हा या मागणीचा पाठपुरावा करणार आहे. सा.बां. विभागाच्या कार्यालयाचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया कशी सुरु होईल, यावर माझा भर राहील.- गणेश तर्वेकर, भाजपा नेता, नागभीड
बांधकाम विभागाच्या जागेवर बसस्थानक हलवा
By admin | Published: April 27, 2016 1:04 AM