लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : बाम्हणी-चांदी हा आंतरजिल्हा मार्ग बंद करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाने चालविल्या आहेत. हा मार्ग बंद झाला तर दोन्ही जिल्ह्यांतील काही गावांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.
नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या बाम्हणी येथून हा आंतरजिल्हा मार्ग भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे जातो. पवनीला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून नागभीड तालुक्यातील अनेक नागरिक या रस्त्यानेच प्रवास करतात; तर पवनी तालुक्यातील चांदी, चन्नेवाडा व इतर दोन-तीन गावांना पवनीपेक्षा नागभीड जवळ असल्याने या गावातील नागरिक कोणत्याही कामासाठी याच रस्त्याने नागभीडला येतात. एवढेच नाही तर या गावातील बरेचसे विद्यार्थी नागभीड येथेच शिक्षणासाठी येत असतात. बाम्हणी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रेल्वेलाईनच्या पलीकडे आहेत. त्यामुळे बाम्हणी येथील नागरिकांना रोजच रेल्वे फाटक ओलांडून शेतात जावे लागते.
आतापर्यंत नॅरोगेज रेल्वे लाईन असल्यामुळे कोणतीच अडचण नव्हती. रेल्वेने तयार केलेल्या फाटकावरून नागरिक व वाहनांची रहदारी सुरू होती; पण आता या रेल्वे लाईनचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. माहितीनुसार, रेल्वे विभाग आता पूर्वीप्रमाणे या ठिकाणी फाटक ठेवण्यास तयार नाही. फाटकच राहणार नसल्याने ये-जा बंद होणार हे निश्चित आहे. तसे सूतोवाच रेल्वेने केल्याचीही माहिती आहे. ही बाब बाम्हणीवासीयांच्या लक्षात येताच चांगलीच खळबळ माजली. लगेचच गावकऱ्यांनी येथील तहसीलदार यांना भेटून हे फाटक कायम ठेवून हा आंतरजिल्हा मार्ग सुरू ठेवण्याच्या मागणीचे सोमवारी (दि. ३०) निवेदन दिले. या संदर्भात येथील तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता गावकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले असल्याचे सांगून रेल्वेकडे यासंबंधी विचारणा करू, अशी माहिती दिली.
कोट
हा मार्ग बंद करण्याचा प्रस्ताव आहे. गावकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कोटगाव गेटपासून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे विचाराधीन आहे.
- योगेश फुंडे, रेल्वे अभियंता, नागपूर विभाग.