चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सत्र २०१३-१४ चे संच निर्धारण सत्र २०१४-१५ च्या आॅगस्टमध्ये देण्यात आले. मात्र त ेसुद्धा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या अन्याया विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर अडबाले यांनी आंदोलनात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रात एका महिन्यात संच निर्धारण न करता वेगवेगळ्या महिन्यात संच निर्धारण करुन यवतमाळ जिल्ह्यात प्रयोगशाळा परिचर पदाला मान्यता तर चंद्रपूर जिल्ह्यात कनिष्ठ लिपिक दर्जाचे पद गोठवून त्यांना शिपाई पदाचा दर्जा देण्यात आला. अर्ध वेळ ग्रंथपाल हे पद पूर्णपणे गोठविण्यात आले. पूर्वी इयत्ता ५ ते ७ व्या वर्गासाठी बारावी डी.एड. ही शैक्षणिक अर्हता आता फक्त पाच व्या वर्गाकरिताच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत, असे ते म्हणाले.शिक्षण सेवकांच्या सेवा समाप्त करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले आहे. या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात गोंधळाचे तर शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सत्र २०१३-१४ चे संच निर्धारण रद्द करावे, असे अडबाले यांनी यावेळी म्हटले. याप्रसंगी कोरपना तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडलकर यांनी, शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ विधानपरिषद सभागृहात अभ्यासू आमदार नसल्यामुळे आली आहे. मात्र इतर शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार या प्रश्नाचे गांभीर्याने लक्षात घेत नाहीत, असे सांगितले. जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी, शासन निर्गमीत आदेश वेळोवेळी बदलतत असते. त्यामुळे प्रत्येक वेळी चुकीचा अर्थ लागतो. ज्या शिक्षकांना यापूर्वी ज्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर आणि शैक्षणिक अर्हतेनुसार मान्यता दिली ते आता चुकीच्या संच निर्धाणामुळे अतिरिक्त ठरत आहे, असे सांगितले. याप्रसंगी विभागीय कार्यवाह जगदीश जुनघरी, प्रभाकर पारखी, श्रीधर फटाले, राजू साखरकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील शेरकी तर संचालन दिगंबर कुरेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
चुकीचे निर्धारण रद्द न केल्यास आंदोलन
By admin | Published: October 22, 2014 11:16 PM