वरोरा :वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेले वरोरा तालुक्यातील खांबाडा गावात देशी व विदेशी दारु दुकान नव्याने सुरू करण्याकरिता ग्रामसभेत विरोध करण्यात आला. यााबाबत ठरावही ग्रामसभेने घेतला. यामध्ये नऊ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर परत परवानगी नाकारलेल्या देशी व विदेशी दारु दुकान सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चाहुल ग्रामस्थांना लागली असल्याने ग्रामस्थांनी आपला प्रखर विरोध सुरू केला आहे. ग्रामपंचायत खांबाडा परिसरात देशी व विदेशी दारु दुकान सुरू करण्याबाबत २३ सप्टेंंबर २०१३ मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशी व विदेशी दारु दुकानांना नव्याने परवानगी देऊ नये. याबाबत ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कारवाईपत्रिकेत नोंदही करण्यात आली. त्यामुळे आता खांबाडा ग्रामपंचायत हद्दीत नव्याने देशी विदेशी दारु दुकान सुरू होणार नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. याला जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. त्यानंतर परत देशी व विदेशी दारु दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती समोर आल्या. ग्रामसभेने परवानगी नाकारल्यानंतर आता देशी व विदेशी दारु दुकान सुरू होऊ नये, याकरिता ग्रामस्थांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. ग्रामसभा किंवा आमसभा बनावट दाखवून त्यामध्ये दुकान सुरू करण्याबााबत ठराव घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत. ग्रामसभेत ठराव नामंजूर झाल्यानंतर परत परवानगी दिल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामसभेच्या नामंजुरीनंतरही दारु दुकान सुरू करण्याच्या हालचाली
By admin | Published: June 23, 2014 11:46 PM