लोकमत न्यूज नेटवर्कसावली : चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी २७ मे च्या निर्णयानुसार हटविण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेली वैनगंगा नदी काठावरील गावांमध्ये दारू दुकाने सुरू करण्याच्या हालचाली काही मद्यसम्राटांनी सुरू केल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरी, सावली, व गोंडपिंपरी अशा तीन तालुक्यातून वाहते. सुमारे शंभर किमी अंतर असलेल्या परिसरात मदिरालये उघडण्यासाठी अनेक दिग्गज कामाला लागले आहेत. या तीन तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे मुख्य मार्ग आहेत. या मार्गावर मदिरालये सुरु करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी नदीच्या जवळ मदिरालये सुरु होणार आहेत. वैनगंगा नदीपासून गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी, आणि आष्टी ही शहरे ७ ते १२ किमी अंतरावर आहेत. या परिसरातील मद्यप्रेमींच्या सुविधेसाठी ब्रम्हपुरी, सावली, आणि गोंडपिंपरी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मदिरालये सुरु होण्याच्या हालचाली सुरू आहेत.चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी होण्याआधी ही या परिसरात मोठ्या प्रमाणात मदिरालये उघडण्यात आली होती. त्याच ठिकाणी व इतरही अनेक सोईच्या जागी मदिरालये उघडण्यासाठी धावपळ करीत असल्याचे बोलले जात आहे. या मदिरालयांमधून गडचिरोली जिल्ह्यात दारुची अवैध वाहतूक करणे सोईचे ठरणारे आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी या तालुक्यात मदिरालये सुरु करण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच उत्पादक शुल्क विभागाने प्रत्येक तालुक्यात किमान २५ दुकाने सुरू करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.त्यामुळे दारूच्या क्षेत्रातील दिग्गजांची नजर याच तालुक्यावर आहे. अनेक राजकीय पुढारी सुद्धा या कामासाठी व्यस्त असल्याने दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.