लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगत आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. विरोधक काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यापुढे अडचणी वाढवित आहेत. त्याचा फटका धानोरकरांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच बसण्याची शक्यता आहे.पक्षनिष्ठा बासनात गुंडाळून शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या बाळू धानोरकरांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला खरा; परंतु त्यांचा काँग्रेस प्रवेश त्यांना अडचणीत तर आणणार नाही ना, अशी भीती राजकीय विश्लेषकांमध्ये व्यक्त केली जात आहे. विविध मुद्दे पुढे करून धानोरकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. विद्यमान खासदार व भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा आहे, तर काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. वणी परिसरात त्यांचे दारूचे दुकानदेखील आहे. त्यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे. अहीर आणि धानोरकर यांचा फोटो एकत्र करून त्यावर खासदार दूधवाला हवा की दारूवाला? असा सवाल उपस्थित करीत तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे धानोरकरांची चांगलीच पंचाईत झाली आहे.भाजपाच्या प्रचार सभांमधूनही धानोरकर यांच्या दारू व्यवसायावर मोठे नेते सडकून टिका करताना दिसत आहेत.त्यामुळे प्रचार सभांमध्ये चांगलीच रंगत येत आहे. महिलांचा दारूला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे भाजपाकडून दारूचा मुद्दा पुढे करून महिला मतांना ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.दुसरीकडे धानोरकरांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जात पाच गुन्हे नमूद असून त्यामध्ये तब्बल १३ कलमांचा समावेश आहे. धाकदपटशाही, कायद्याचे उल्लंघन, यासारख्या गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. तर प्रतिस्पर्धी उमेदवारावर एकही गुन्हा दाखल नाही, असेही दिसून येते.दारू दुकानाला टाळेविरोधकांकडून सातत्याने ‘दारू’चा मुद्दा पुढे करून नकारात्मक प्रचार केला जात असल्याने कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. अपप्रचार वाढू नये म्हणून बाळू धानोरकर यांनी वणीतील दारू दुकान काही दिवसांपासून बंद ठेवण्याची काळजी घेतली आहे. सध्या या दुकानाला टाळे लावण्यात आले आहे.
Lok Sabha Election 2019; चंद्रपूरचा खासदार दारूवाला हवा की दूधवाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:26 PM
चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगत आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
ठळक मुद्देसोशल मीडियावर चर्चा : धानोरकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न