खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली
By राजेश भोजेकर | Published: June 19, 2024 06:46 PM2024-06-19T18:46:25+5:302024-06-19T18:47:10+5:30
बरांज खाण परिसरात तणाव; काँग्रेस व प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले खाणीतील कामकाज
भद्रावती : बरांज गावाचे पुनर्वसन करावे व स्थानिकांना रोजगार द्यावा, यासह १६ मागण्यांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बुधवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता बरांज येथील कर्नाटक एम्टा खाण परिसरात आंदोलन सुरू असताना एका आंदोलनकर्त्याने केपीसीएल कंपनी अभियंत्याच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेऊन कोळसा खाणीतील कामकाज आज दिवसभर बंद पाडले.
केपीसीएल कंपनीने कोळसा खाणीसाठी जमीन अधिग्रहित केली. मात्र, बरांज गावाचे पुनर्वसन व स्थानिकांच्या रोजगारासह अन्य १६ मागण्या सोडविल्या नाही. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आमदार व नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे खाण परिसरात आंदोलन केले होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खाण व्यवस्थापनाला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन खाण परिसरात आंदोलन सुरू केले. दरम्यान, कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी पूर्ण न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कर्नाटका एम्टा कंपनीविरोधात नारेबाजी केली. दरम्यान, बाचाबाची होऊन निलेश भालेराव नावाच्या कार्यकर्त्याने केपीसीएलचे मुख्य अभियंता शिवकुमार यांच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणल्याने अनर्थ टळला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कंपनी विरोधात नारेबाजी करीत खाणीतील कामकाज बंद पाडले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राजू डोंगे, महिला शहर अध्यक्ष सरिता सूर, प्रशांत झाडे, किशोर हेमके, संध्या पोडे, ईश्वर निखाडे, प्रमोद गेडाम, विलास टिपले, संदीप कुमरे, रितेश वाढई, शिवाणी कोंबे, कविता सुपी,राजु चिकटे, अजित फाळके, महेश कोथळे, लता इंदुरकर, वसंता उमरे आदींसह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अभियंत्याकडून पोलिसात तक्रारच नाही
केपीसीएल कंपनीचे मुख्य अभियंता शिवकुमार यांना मारहाण झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, शिवकुमार यांनी मारहाणप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केली नाही. कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच तक्रारीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
जोपर्यंत बरांज प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या कंपनीकडून मान्य केल्या जात नाही तोपर्यंत खाणीतील कामकाज बंदच राहील. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे -प्रतिभा धानोरकर, खासदार
प्रकल्पग्रस्त, कार्यकर्ते व कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना बाचाबाची होऊन निलेश भालेराव नावाच्या व्यक्तीने अभियंत्याला थापड मारल्याची माहिती मिळाली. पण अद्याप तक्रार नाही. तक्रारीनंतरच पुढील कारवाई केली जाईल -बिपीन इंगळे, ठाणेदार भद्रावती
सोशल व्हायरलमध्ये खासदारांचा भाऊ घेऱ्यात
खासदार धानोरकर यांचा सख्खा भाऊ प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओचे अवलोकन केले असता प्रवीण काकडे हे अधिकाऱ्याची कानउघाडणी करीत असताना अधिकाऱ्याच्या मागे उभ्या असलेल्या एका आंदोलकाने अचानक अधिकाऱ्याच्या गालावर चापट मारली. यानंतर एकाएकी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ओढताण झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर हेही तिथेच होते. भद्रावती पोलिस तणाव निवळताना दिसत होते.