चंद्रपूर : आजच्या औद्योगिक युगात विजेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विजेपासून ज्याप्रमाणे फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर नुकसानीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने विजेचे काम करताना किंवा इतरवेळी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. वीज तार तुटली, खांब पडला तर स्वत: हात न लावता त्वरित महावितरणच्या टोल फ्री क्रमांक किंवा व्हॉटस्ॲप क्रमांकावरही कळवा. यामुळे संभाव्य धोका टाळता येणे शक्य आहे.
विजेचा वापर वाढल्यामुळे अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. अनेक वेळा सुरक्षितता न बाळगता काही नागरिक वीज खांब, तुटलेल्या तारांना हात लावण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. असे न करता महावितरण कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये फोन करून तक्रार केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. यामध्ये वीज जाणे, विजेची तार तुटणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, वीज बिल व मीटरसंबंधीच्या तक्रारीसाठी ग्राहकाला आता महावितरणने सुविधा दिली आहे.
या नंबरवर करा व्हॉटस्ॲप किंवा एसएमएस
वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅंडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.
तत्काळ घेणार दखल
व्हॉटस्ॲप किंवा टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार केल्यास महावितरणचे अधिकारी तत्काळ दखल घेणार आहेत. यासाठी ग्राहकांना संबंधित नंबरवर तक्रार करणे मात्र गरजेचे आहे.
स्वत: हात न लावणे योग्य
वीज खांब कोसळला, वीज तार तुटली, तर स्वत: हात लावू नये, अनेक वेळा या तारांमध्ये वीज प्रवाह असतो. त्यामुळे सुरक्षेसाठी हात लावू नये. अनेक वेळा त्वचेच्या ओलसरपणावरसुद्धा विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. कोरड्या त्वचेचा रेझिस्टन्स जास्त, तर ओलसर त्वचेचा रेझिस्टन्स कमी असतो, म्हणूनच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे किंवा स्विच चालू-बंद करणेही टाळावे.
ग्राहकांना सुविधा देण्यासाठी महावितरणने विविध पावले उचलली आहेत. यामध्ये वीज खांब कोसळला, तार तुटली, तर तक्रार करण्यासाठी व्हॉटस्ॲप नंबर, टोल फ्री नंबर जारी केले आहेत. या माध्यमातून ग्राहकांना महावितरणला तक्रार करता येते.
-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, महावितरण