चंद्रपूर : महिला दिनाचे औचित्य साधून महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे महिलांनी दुचाकी रॅली काढून शहरात जनजागृती केली. यावेळी थकीत वीज बिल त्वरित भरण्याची विनंती यावेळी ग्राहकांना करण्यात आली.
महिलांद्वारे महाकृषी ऊर्जा धोरण २०२० अभियान- अंतर्गत राबविण्यात येत आहे. कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत- वीजबिल भरण्यासंबंधी जनजागृती, ऊर्जास्त्रोतांचे संवर्धन,सौर कृषिपंपांच्या माध्यमातून वीज, महाकृषी ऊर्जा धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सुधारित थकबाकीवर व्याज व दंड माफ करून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.
यावेळी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या पुढाकाराने महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे महिलांनी स्कूटर रॅलीचे आयोजन केले होते.
चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी स्कूटर चालवित सदर रॅलीचे नेतृत्व केले. ही रॅली स्थानिक अंचलेश्वर गेट, गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वाहतूक कार्यालय मार्गे महावितरणच्या ऊर्जानगर उपकेंद्रात सांगता झाली. दरम्यान, महावितरणमध्ये महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. या रॅलीत महावितरणच्या महिला अभियंता, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे पदाधिकारी अमित बिरमवार, बंडू कुरेकार, रोहिणी ठाकरे व उपकार्यकारी अभियंता विजय राठोड, आरती बागुलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.