लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने रविवारी राज्यातील ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बल्लारपूरविधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर, तर चिमूर विधानसभा क्षेत्रातून बंटी भांगडिया यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अन्य चार विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून यावेळीसुद्धा सुधीर मुनगंटीवार हेच निवडणूक लढवतील हे जवळपास यापूर्वीच निश्चित झाले होते. केवळ नावाची औपचारिकता बाकी होती. रविवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दोघांचेही नाव जाहीर होताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आनंद व्यक्त केला.
नवीन चेहऱ्यांना संधी जिल्ह्यात ज्या ठिकाणी भाजपचे विधानसभा सदस्य नाही, त्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितच भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपकडून चार नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की, काही जागा महायुतीच्या वाट्याला जाणार याबाबत आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वरोरा, ब्रह्मपुरीबाबत संभ्रम कायम २०१९ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभेची जागा शिवसेनेने लढविली होती. त्यामुळे यावेळी शिंदेसेनेकडे ही जागा जाते की, भाजप दावा करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे वरोरा विधानसभा क्षेत्र शिंदेसेनेकडे गेल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना मिळताच तीन दिवसांपूर्वी भाजपच्या नागपूर येथील कार्यालयावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धडक देत कोणत्याही स्थितीत ही जागा शिंदेसेनेला देऊ नये, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे या जागेवरून राजकारण तापले आहे.
"पार्टीने संधी दिली आहे. महायुतीत महाराष्ट्राची प्रगती आणि स्थीर सरकारचा संदेश पोहोचविण्याचे काम निश्चितपणे आपण करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न आहे." - सुधीर मुनगंटीवार