महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७-अ नुसार सन २०१५-१६ चे चंद्रपूर शहर महानगरपालिकेचेही लेखापरीक्षण झाले. हा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. लेखापरीक्षण करताना त्या संस्थेच्या जमा आणि खर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षकाला आढळलेल्या त्रुटीनुसार लेखा आक्षेप लिहितात. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर अहवालातील लेखा आक्षेपांचे अनुपालन स्थानिक निधी लेखा विभागाला सादर होते. अनुपालनाची तपासणी करून सदर लेखा आक्षेप वगळला जातो, असा दावा आयुक्त राजेश मोहिते यांनी केला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या चौकशीच्या संकेतानंतरच आयुक्तांनी हे स्पष्टीकरण माध्यमांकडे पाठवून पदाधिकाऱ्यांच्या बचावासाठी सरसावले, ही बाब मनपाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
‘त्या’ नगरसेवकांची आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती
२०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालाबाबत मनपा पदाधिकाऱ्यांना पाठबळ देणारे आयुक्तांचे स्पष्टीकरण माध्यमांमध्ये झळकताच गुरुवारी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. लेखापरीक्षणासंदर्भात सभागृहात भूमिका मांडण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची असताना, यामध्ये थेट माध्यमांमध्ये उडी घेऊन पाठराखण करण्याचे कारण काय, यासारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना विचारले असता, आज आयुक्तांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले. शिवाय पालकमंत्र्यांनी चौकशीचे संकेत दिल्यानंतर दोषींच्या बचावासाठी आपण का धावलात, असा प्रश्न विचारल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.