राजू गेडाम
मूल : येत्या नोव्हेंबर महिन्यात मूल नगरपरिषदेची मुदत संपणार असून जवळपास पाच महिन्यांचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी कोरोनाच्या सावटात नगर परिषदेची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे.
कोरोना काळात मदतीचा हात पुढे करण्यात भाजपा व कॉंग्रेस कुठलीही कसर सोडत नसल्याचे दिसून येते. सध्या नगर परिषदेवर भाजपची सत्ता असून सत्ता कायम रहावी, यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न आहे. मात्र यावेळी कॉंग्रेसदेखील सक्षमपणे रिंगणात उतरुन सत्ताबदल करण्याचा प्रयत्न चालविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप व कॉंग्रेस या दोन पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता असली तरी इतरही पक्ष आपली मोर्चेबांधणी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या स्थितीवर निवडणुकीचा खेळ अवलंबून राहणार बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा.कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल तालुक्यात यापूर्वी कॉंग्रेसची पकड होती. मात्र आपसी मतभेदाचा फायदा घेत माजी आमदार शोभा फडणवीस यांनी आपला दबदबा निर्माण केला. तेव्हा तब्बल ३० वर्षांपासून भाजपाचे वर्चस्व आहे. या तालुक्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामाचा बोलबाला आहेच. निवडणूक म्हटली की त्यात पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्याचाच प्रत्यय ग्रामपंचायतीच्या निकालावरून दिसून येते. गावागावात आपसी मतभेदांमुळे एकच पक्षाचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे ठाकल्याने मते विखुरली गेली. त्याचा परिणाम पराभव झाल्याचे दिसून आले.
बॉक्स
सध्या भाजपची सत्ता
येत्या पाच महिन्यानंतर नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. मागील निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली होती. यात भाजपच्या नगराध्यक्षासह १७ पैकी १६ नगरसेवक निवडून आले होते. कॉंग्रेसला एका नगरसेवकावरच समाधान मानावे लागले होते. आजच्या घडीला महाविकास आघाडीचे सरकार असून कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार मंत्री आहेत. तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत असल्याने कॉंग्रेसकडून चांगलीच रणनीती खेळली जाण्याची शक्यता आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नगर परिषद निवडणूक प्रतिष्ठतेची असल्याने तेसुध्दा विशेष लक्ष घालणार आहेत. त्यामुळे नगर परिषद मूलची निवडणूक चढाओढीची होण्याची दाट शक्यता आहे.