आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले. या पार्किंग झोनमध्ये शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क होतील आणि वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा होती. मात्र मनपाने वाहन पार्क करण्यासाठी शुल्क ठेवले असल्याने नागरिकांनी या वाहनतळांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी वाहने रस्त्यावरच उभी दिसत असून वाहतूक कोंडीही कायम आहे.चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासामुळे चंद्रपूरच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. वाहन ही आजच्या काळातील मूलभत गरज झाली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही भरमसाठ वाढत आहे. मागील तीन वर्षातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास वाहनांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रस्ते मात्र इंचभरही वाढले नाही. वाहने वाढण्याची गती बघता वाहतूक व्यवस्थेत आता आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे अपघाताचीही संख्या वाढून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो.चंद्रपूरची लोकसंख्या साडे चार लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्या वाढल्याने शहरे गजबजली. जागा अपुरी पडू लागल्याने अतिक्रमण होऊ लागले. यावर प्रशासनाला वेळीच नियंत्रण आणता आले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अतिक्रमण व गजबजलेल्या लोकवस्त्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.एकीकडे रस्ते अरुंद होत असताना दुसरीकडे वाहनांची संख्या मात्र लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या उदयास येऊ लागली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वाहतूक व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाही. शहरातील कोणत्याही रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. महानगरपालिका अस्तित्वात आली असली तरी टाऊन प्लॅनिंगनुसार रस्त्याचे बांधकाम अद्याप झालेले नाही. कस्तुरबा आणि महात्मा गांधी हे चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांवर दोन मोठी चारचाकी वाहने गेली तरी वाहतुकीची बोंब होते. चंद्रपुरात आॅटोरिक्षा, स्कूलबस, दुचाकी, चारचाकी वाहने भरमसाठ वाढल्याने वाहतुकीची कोंडी शहरातील प्रत्येक रस्त्यांवर झालेली दिसून येते. ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून महापालिकेने गांधी चौक, आझाद गार्डन, महात्मा गांधी शाळा व राजे धर्मराव शाळा या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले. मात्र या ठिकाणी वाहन ठेवण्यासाठी मनपाकडून शुुल्क आकारले जाते. चारचाकी वाहनांसाठी प्रति तीन तास २० रुपये व दुचाकी वाहनांकरिता प्रति तीन तास १० रुपये, असे शुल्क आहे. परंतु हे शुल्क देऊन वाहन पार्क करण्यास नागरिक अनुच्छुक दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या ही वाहनतळे ओस पडलेली दिसतात. दुसरीकडे रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची पूर्वीसारखीच गर्दी दिसते. त्यामुळे महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, जटपुरा गेट, आझाद बागेच्या बाजुला, गोकूल गल्ली, गांधी चौक, छोटा बाजार आदी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.कारवाई करा, अन्यथा शुल्क हटवावाहनतळ सोडून दिवसभर रस्त्यावर अस्ताव्यस्त ठेवलेल्या प्रत्येक वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करणे गरजेचे आहे. वारंवार असे होत राहिले तर आपसुकच रस्त्यावर वाहने पार्क करणे नागरिक टाळतील. कारण तिथेही आर्थिक भुर्दंड बसेल. अन्यथा दुसरा पर्याय अधिकृत वाहनतळावरील शुल्क हटविणे. शुल्क नसेल तर नागरिक तिथेच वाहन पार्क करतील. या दोन्ही प्रकारांपैकी एक प्रकार अमलात आला तर नक्की वाहतूक कोंडी कमी होईल.६८ हजारांचीच कमाईमनपाच्या या चार पार्र्कींग झोनमधील प्रत्येक वाहनांकडून २० रुपये आणि १० रुपये प्रति तीन तासांसाठी घेतले जातात. तरीही मागील तीन महिन्यात या चारही वाहनतळांमधून मनपाला केवळ ६८ हजार ४९० रुपयांचीच कमाई झाली आहे. वास्तविक या वाहनतळाच्या आजुबाजुलाच दररोज शेकडो वाहने उभी दिसतात. यावरून नागरिक किती उदासीन आहेत, हे दिसून येते.
मनपाचे पार्किंग झोन ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:16 AM
चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले.
ठळक मुद्देवाहतूक कोंडी कायम : रस्त्यावरच बेलगाम पार्किंग