मूल : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत सर्व दुकाने बंद असताना आडमार्गाने वस्तूची विक्री केली जात आहे. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केशवाणी यांच्या गोडावूनमधून कपड्यांची विक्री करताना आढळले. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गोडावूनला सील ठोकले आहे.
नगर प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कारवाई केल्याने शहरातील काही विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे दुकान वगळता शहरातील इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत सुरू राहत असल्याची संधी साधून शहरातील काही व्यावसायिक जीवनावश्यक साहित्यांसोबतच इतर साहित्याची विक्री करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन करीत आहेत. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या शहरातील त्या विक्रेत्याविरुद्ध व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असल्याची संधी साधून शहरातील काही कापड, इलेक्ट्रिक साहित्य, जनरल साहित्य विक्रेते समोरून शटर बंद करून मागील दाराने, तर कोणी गोडावूनमधून विक्री करीत असल्याचे दिसून आले. रविवारला स्नेहल होजिअरी स्टोअर्सचे संचालक केशवाणी हे दुकानामागील गोडावूनमधून रेडिमेड कपड्याची विक्री करीत असल्याचे कारवाई पथकाला आढळून आले. ही कारवाई पथकातील तुषार शिंदे, विशाल मुळे, विलास कागदेलवार, आदींनी केली.