संकेत व शुभम हे दोघे मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी शुभम संधी बघत होता. दरम्यान, ८ तारखेला शुभम व संकेत दोघेही चंद्रपूरला आले. त्यानंतर शुभमने आपला एक मित्र संगम सागोरेला सोबत घेतले. त्यांनी बारमध्ये दारू ढोसली. त्यानंतर मित्रनगर परिसरातील पडक्या वसाहतीकडे गेले. यावेळी तेथे त्यांचा पुन्हा वाद झाला. शुभम व संगम यांनी संकेतच्या पोटावर, छातीवर चाकून सपासप वार केले. तसेच त्याला तेथेच रक्ताच्या थारोळ्यात वसहतीच्या निर्जनस्थळी सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खरसान, पोलीस उपनिरीक्षक एकरे व रामनगर पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गुन्हा दाखल करून शुभम साखरकरला व संगम सागोरेला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खरसान करीत आहेत.
बाॅक्स
आरोपीनेच पोलिसांना फोन करून दिली माहिती
संगम सागोरे याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान १० तारखेला संगमने मित्रनगर परिसरातील वसाहतीच्या मागे मृतदेह पडून असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. त्याला पोलिसांनी ठाण्यात बोलवून घेतले. यावेळी दोघेही ठाण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी स्वत:च हत्या केल्याची कबुली देत घटनास्थळ दाखवले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.