चंद्रपूर : बाबूपेठमधील तुकडोजी महाराज चौकात झालेली सोनू राजू चांदेकर (२६) रा. तुकडोजी महाराज चौक बाबूपेठ या तरुणाची हत्या दारूसाठी पैशावरून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता हत्या झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोली पवन रतन पाटील (२०) याला नऊ तासात पकडून गजाआड केले.
सोनू व पवन चांदेकर दोघे एकमेकांना ओळखत होते. सोनूने पवनला काही रुपये दिले होते. मंगळवारी रात्री पवन घराकडे जात असताना त्याची तुकडोजी महाराज चौकात सोनूशी भेट झाली. यावेळी सोनूने दारू पिण्यासाठी पवनला रुपये मागितले. पवनला पैसे नसल्याचे सांगितले. सोनू पैशासाठी तगादा लावत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. अशातच रागाच्या भरात सोनूने पवनला चाकूने भोसकले. यामध्ये सोनूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. माहिती होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी लगेच आरोपीच्या शोधात तीन पथकासह घटनास्थळ गाठले. तपासाची चक्रे गतीने फिरवताच आरोपी पवन आपल्या मित्राच्या घरी कपडे बदलून पसार झाल्याची माहिती मिळाली. पथकाने पवनचे घर गाठून त्याच्या आईने तो बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो मारोडा येथील एका नातेवाईकाच्या घरी असल्याचे समजले. तेथून पवनला अटक करून त्याला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सुरेश केमेकर, राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, मिलिंद चव्हाण, जमीर पठाण, अनुप डांगे, अमजद खान, कुंदनसिंग बावरी, संजय वाढई, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोठे, प्रदीप मडावी, मयूर येरणे आदींनी केली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे करीत आहेत.