चंद्रपूर : मोहरी हे रब्बी हंगामातील एक उत्तम पीक असून शेतकऱ्यांनी पुढील येणाऱ्या रब्बी हंगामात मोहरीची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.
अखिल भारतीय स. जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर अंतर्गत वढा येथील रमेश गोहोकर यांच्या शेतात मोहरी शेतीदिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.
यावेळी वरोरा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, डॉ. बिना नायर प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना मोहरी या पिकास वन्यप्राणी कमी प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे तसेच कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे असल्यामुळे या पिकाची लागवड करावी असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. बिना नायर, जवस पैदासकार यांनी शेतकऱ्यांना जवस व मोहरी तेलाचे आहारातील महत्त्व आणि पी. के. व्ही. एन .एल २६० या जवस पिकाच्या वाणाबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मोहरी पैदासकार, डॉ. संदीप कामडी यांनी केले. त्यांनी मोहरी पिकाकरिता विदर्भातील थंड हवामान कशाप्रकारे उपयुक्त आहे, मोहरी कमी खर्चात कशाप्रकारे जास्त उत्पादन देते, मोहरी विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या बाजारपेठा तसेच टी.ए. एम. १०८-१ आणि शताब्धी या वाणाबद्दल माहिती दिली.
डॉ. स्वप्निल ठाकरे, मोहरी कृषी विद्यवेत्ता यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मोहरी पीक लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर माहिती दिली तर जवस रोगशास्त्रज्ञ जगदीश पर्बत यांनी मोहरी पिकावरील येणारी किड व रोग, त्यांची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
यावेळी मोहरी उत्पादक शेतकरी रमेश गोहोकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तांत्रिक सहायक शरद भुरे यांनी मानले.