चंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०१५-१६ या वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात १५ कामांमध्ये अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप घेण्यात आला. हा अहवाल सोमवारी ऑनलाइन सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला असता मोठा गदारोळ झाला. अनियमिततेमुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने दोषी पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाने दुपारी ९ वाजता ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, अन्य सभापती तसेच सर्व नगरसेवक ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. सभा सुरू झाल्यानंतर विषय क्र. ६ अनुसार २०१५-१६ या वित्तीय वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला. दरम्यान, वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात एकूण १५ कामांमध्ये अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप असल्याचा मुद्दा काँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढीया आदींनी सभेत नोंदविला. या अनियमिततेमुळे मनपाचे मोठे नुकसान झाले. कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगसेवकांनी केला. सभेदरम्यान शहरातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभी मनपा सभापती स्व. अंकुश सावसाकडे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी पालकमंत्री एकनाथराव गायकवाड, माजी स्वीकृत सदस्य अनिल त्रिवेदी, खासदार राजीव सातव आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
लेखापरीक्षणातील नेमका आक्षेप काय?
मनपाच्या ७१ कामांवर नियमबाह्य खर्च करण्यात आला. आक्षेपाधीन २०० कोटी ३३ लाख ७९ हजार ४६९ हजारांपैकी वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रुपये लेखापरीक्षणात दाखविण्यात आले. लेखा विभागाने यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब असून सन २०१५-१६ मध्ये मनपाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.
दोषींकडून ३० कोटी ३९ लाख वसुलीची मागणी
लेखापरीक्षणात दाखविण्यात आलेले वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रक्कम सन २०१५-१६ च्या कालावधीतील पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेविका सुनीता लोढिया, कल्पना लहानगे, संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, विना खनके, सकीना अन्सारी, नंदू नागरकर, अशोक नागापुरे, आली अहमद मन्सुर, नीलेश खोब्रागडे, कुशल पुगलिया, पप्पू देशमुख आदींनी केली आहे.
न्यायालयात दाद मागण्याचा बेले यांचा इशारा
लेखापरीक्षण अहवालाला सभेत मान्यता देण्यापूर्वी योग्य चर्चा करून कारवाई करण्याबाबत महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांना पत्र दिले होते. आयुक्त गैरहजर होते. महापौर यांनी चर्चा न करता सभागृहातून निघून गेल्या. २०१५-१६ या वर्षातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा नगरसेवक देवेंद्रे बेले यांनी दिला.
कोट
केवळ विरोधासाठी विरोध
लेखापरीक्षण विभागाचा अहवाल सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यातील काही आक्षेपांबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विनाकारण गदारोळ केला. हा प्रकार केवळ विरोधासाठी विरोध यातला आहे. २०१५-१६ मध्ये कोण सत्तेवर होते हे विरोध करणाऱ्यांना ठाऊक आहे. नियमांची कोणतीही माहिती जाणून न घेता केवळ विरोध करण्याला काही अर्थ नाही.
- राखी कंचर्लावार, महापौर, चंद्रपूर