चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियान ३.० या अभियानातंर्गत वरोरा तालुक्यातील आनंदवन ग्रामपंचायतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते. नुकताच या अभियानाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अडीच हजार लोकसंख्येपेक्षा कमी गटात वरोरा तालुक्यातील आनंदवन ग्रामपंचायतीने ५० लाखांचे बक्षीस जिकंले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर माझी वसुंधरा अभियान ३.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एक एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील ४११ नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था व १६ हजार ४१३ ग्रामपंचायत अशा एकूण १८ हजार ८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
वरोरा तालुक्यातील आनंदवन ग्रामपंचायतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते. स्पर्धेचे डेस्कटॉप मूल्यांकन व फील्ड मूल्यांकन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले. त्याचा निकाल ५ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. अडीच हजार लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या गटात ५० लाखांचे बक्षिस प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सरपंच रुपवंती दरेकर, सचिव विद्या बापूजी गिलबिले (खरवडे), उपसरपंच शौकत अली खान, माजी उपसरपंच सुधाकर कडू, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, ज्येष्ठ सल्लागार माधव कविश्वर, आनंदवन कार्यकर्ता दीपक शिव, मुख्याध्यापक विद्या गोखरे, कपिलदेव कदम, ग्रा. पं. सदस्य ज्योती टेकाम, प्रिया ताजने, ग्रा. पं. सदस्य नंदा शिव, ग्रा. पं. सदस्य संगीता धोंगडे, ग्रा. पं. सुनिल नक्षिणे, ग्रा. पं. सदस्य राजू बोंदरकर, प्रेमदास हेमने, ताराचंद चौधरी आदींनी सहकार्य केले.
असा होणार निधीचा वापर
ग्रामपंचायतील मिळालेल्या एकूण ५० लाख रुपयांच्या निधीचा आढावा वेळोवेळी माझी वसुंधरा अभियान संचालनालय प्रधान सचिव यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. बक्षीस रकमापैकी ५० टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढविण्यासाठी, ४० टक्के रक्कम इतर उपाययोजनासाठी, १० टक्के रक्कम माझी वसुंधरा अभियान ४.० सन २०२३-२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचा विजय त्यांना बक्षीस देण्यासाठी वापरण्यात शासन मान्यता दिली आहे.
आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेला हा पुरस्कार ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिकांच्या सहकार्याचे व मेहनतीचे फळ आहे. पुरस्काराच्या निधीतून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.
- विद्या गिलबिले (खरवडे), सचिव ग्रामपंचायत आनंदवन