डोकेदुखी : दिवसातून १५ वेळा बंद होते लाईट व गेट राजुरा : शहरातील जीर्ण झालेली ब्रिटिशकालिन विद्युत प्रणाली आणि वारंवार बंद होणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटमुळे राजुरा शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसातून १५ वेळा विद्युत प्रवाह खंडित होत असतो. तीच स्थिती रेल्वेगेट बंद होण्याची आहे. १० हजार शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना वेठीस धरणारा आणि सिमेंट कंपन्यांचे चोचले पुरविणाऱ्या या गेटपासून राजुरा शहरातील नागरिकांना कधी सुटका मिळेल, याची प्रतीक्षा सुरू आहे. राजुरातील विद्युत प्रणाली अत्यंत जीर्ण झाली असून रविवारला दुपारी १२ वाजेपासून १० लाख ग्राहकांचा विद्युत प्रवाह खंडित झाला. फक्त आभाळ येताना दिसले तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली, मोर्चे काढले, सभा घेतल्या. परंतु मुळातच विद्युत यंत्रणाच योग्य नसल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकासोबत ग्रामक्षेत्रातील नागरिक हैराण झाले आहेत. राजुरा गेटमुळे विद्यार्थी, पालक संतप्त झाले आहेत. गेटच्या बाहेर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यु एरा इंग्लिश स्कूल राजुरा, नगर परिषद प्राथमिक शाळा, एसटी डेपो राजुरा या गेटमधुन जवळपास दहा ते पंधरा हजार विद्यार्थी व नागरिक दररोज वाहतूक करतात. सिमेंटच्या गाड्या रात्रीला चालवून दिवसा गेट बंद ठेवता कामा नये. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सिमेंट कंपन्या ज्या स्थानिक नागरिकांना गेटवरूनच हाकलून लावतात. त्याचे चोचले पुरविण्याचे काम सुरू आहे. ज्यावेळी कंपन्या तयार झाल्या ज्या कंपन्या २०० कोटीच्यावर नफा कमावित आहे. त्यांनी ५० कोटी खर्च करून रेल्वे उड्डानपूल बांधून दिले पाहिजे, असे आंदोलन झाली पाहिजे. याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्याच भागाचा कच्चा माल, अधिकारी मात्र परप्रांताचे आहेत. राजकीय नेत्यामध्ये कंपणी त्रासाबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. या गेटपासून सुटका करण्याची मागणी , तसेच विद्युत वाहिनी व वितरणाची पद्धत दुरुस्त करण्याचीही मागणी जनतेने केली आहे. (शहर प्रतिनिधी)