लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मजुरांना मिळणारी बांधकाम पेटी मिळविण्यासाठी नागभीड येथे सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. यामुळे नागभीडला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.बांधकाम मजुरांना बांधकाम साहित्याची पेटी मिळणार असून पाच हजार रुपये अनुदान त्या मजुराच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आहे. नागभीड तालुक्यात काही मजुरांना बांधकाम पेटीचे वितरणही करण्यात आले. या वितरणामुळे मजुरांच्या आशा आणखीच पल्लवित झाल्या. सोमवारी तर या गर्दीने कमालच केली. येथील गणेश मंगल कार्यालय व पंचायत समिती परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. नागभीड लगत असलेल्या १० ते १२ गावातील नागरिकांनी अगदी सकाळपासूनच गर्दी करायला सुरूवात केली. दुपारच्या वेळेस तर या गर्दीने उच्चांक गाठला. कागदपत्रे दाखल करण्यासाठी नागरिक जिवाची बाजी लावत असल्याचे येथील गणेश मंगल कार्यालयात दिसून आले. दरम्यान कागदपत्रे दाखल करण्यासाठी आलेल्या या नागरिकांना अगोदरच पंचायत समितीमध्ये नोंद करून घ्यावी लागते असे समजल्यावरून या नागरिकांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला.
नागभीडमध्ये मात्र योजनेसाठी मजुरांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:14 PM