घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : एका ठिकाणी नियुक्ती दिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करू नये, असे संकेत आहेत. मात्र, नागभीड येथील ठाणेदारांच्या बदल्यांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास हे संकेत पायदळी तुडविल्याचे लक्षात येते.
नागभीड येथे एका वर्षात चक्क तीन ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आणि चौथ्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या पाहिल्या तर बदल्यांचे अधिकार असलेल्या वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
२०२३ च्या दुसऱ्या चरणात नागभीड पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी योगेश घारे यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच ठाणेदार योगेश घारे यांनी या ठाण्यावर चांगली पकड निर्माण केली आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले. घारे यांनी सुरू केलेली "सायरन गस्त" काहींच्या टीकेचा विषय ठरली होती. मात्र, या सायरन गस्तीमुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण नक्कीच कमी झाले होते.
मात्र, अचानक २८ जानेवारी २०२४ रोजी योगेश घारे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आणि नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून विजय राठोड यांना नियुक्त करण्यात आले. ते येथे स्थिरस्थावर होत असतानाच अवघ्या सहा महिन्यांत ठाणेदार विजय राठोड यांचे ६ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानांतरण करण्यात आले आणि अमोल काचोरे यांची नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल काचोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने काचोरे यांची आता निदान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी बदली होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अवघ्या दोन महिन्यांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ठाणेदार अमोल काचोरे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. आता नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून रमाकांत कोकाटे यांनी तत्काळ प्रभावाने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून प्रभार स्वीकारला आहे.
तीन वर्षे तरी बदली करू नये येथील ठाणेदारांच्या पदाला लागलेले बदल्यांचे ग्रहण लक्षात घेता, हे ग्रहण येथेच संपून आणि कोकाटे यांनी पूर्ण तीन वर्षे नागभीडच्या ठाणेदारपदी कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किमान तीन वर्षे तरी ठाणेदारांची बदली करू नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे.