नागभीड : येथील पंचायत समितीसमोर चारचाकी वाहनांची गर्दी बघून अनेकांना अचंबा वाटला. आजपर्यंत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील पंचायत समितीच्या इमारतीचे आज लोकार्पण तर नाही ना, अशीही शंका अनेकांना वाटून गेली. पंचायत समितीच्या संपूर्ण परिसरात गुरुवारी चारचाकी वाहनांची अशी गर्दी यापूर्वी कधीच बघायला मिळाली नाही, हे विशेष.
त्याचे असे झाले की, नागभीड पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी अनेक चारचाकी व दुचाकी वाहने उभी होती. या वाहनांसोबतच लोकांची वर्दळही बरीच दिसत होती. अनेकांना या वाहनांचा व वर्दळीचा अचंबा वाटला आणि लोक आपापल्यापरीने तर्कही लढवू लागले. नागभीड पंचायत समितीच्या नवीन इमारतीत सव्वा-दीड वर्षापूर्वीच प्रशासकीय कामकाज सुरू करण्यात आले असले तरी, या इमारतीचे रितसर लोकार्पण अद्यापही झालेले नाही. ही इमारत आजही रितसर लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. आज या इमारतीचे लोकार्पण तर नाही ना, असे अनेकांना वाटून गेले. तसेच काहींना जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोठी बैठक बोलावली असावी, अशी शंका वाटली.
दरम्यान, या प्रतिनिधीनेही उत्सुकतेपोटी नागभीड पंचायत समितीच्या काही आधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, मग्रारोहयोचे आज 'ऑडिट' असून नागभीड हे मध्यवर्ती स्थान असल्याने सर्वांना सोयीचे आहे, त्यासाठी नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि चिमूर येथील संबंधितांना या ऑडिटसाठी त्यांचे रेकार्ड घेऊन बोलाविण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली.