नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० ला लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. तेव्हापासून लाॅकडाऊनपासून नागभीडचा गुरांचा बाजार आताही लाॅकडाऊनच आहे. परिणामी नागभीडच्या बाजारातील गुरांची खरेदी विक्री बंद असून यामुळे शेतकऱ्यांना गुरांच्या खरेदीविक्रीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागभीड येथे दर शनिवारी गुरांचा बाजार भरायचा. नागभीडची कृषी उत्पन्न बाजार समिती या गुरांच्या बाजाराचे व्यवस्थापन करते. नागभीडच्या या गुरांच्या बाजाराने गेल्या चार-पाच वर्षात चांगलेच बाळसे धरले आहे. संबंध तालुक्यातूनच नाही तर आसपासच्या तालुक्यातीलही शेकडो पशुपालक आपली जनावरे या बाजारात विक्रीसाठी आणायचे. अनेक खरेदीदार या बाजारात जनावरे खरेदीसाठी यायचे. रविवारी ब्रह्मपुरी येथे गुरांचा मोठा बाजार भरत असल्याने येथूनच दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीला जनावरे रवाना व्हायची. मात्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्वच सार्वजनिक उपक्रमांवर निर्बंध लादण्यात आले. त्यात बाजारासकट गुरांच्या बाजारांचाही समावेश होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताना सर्वत्र बाजार भरू लागले. मात्र नागभीडचा गुरांचा बाजार मात्र त्याला अपवाद ठरत आहे. शेती यांत्रिकी पद्धतीने करण्यात येत असली तरी तालुक्यात हजारो शेतकरी आजही बैलजोडीद्वारे शेती करीत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्रीसाठी बैल बाजार आवश्यक आहे. मात्र सध्या हंगामाची वेळ नसल्यामुळे हे शेतकरी निश्चिंत आहेत. मात्र हंगामाच्या वेळेपर्यंत बैल बाजार सुरू झाला नाही तर शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो.