अमोद गौरकार
शंकरपूर : स्वतःची शिकार शोधण्यासाठी एक नागोबा वणवण भटकत होता. एका ठिकाणी त्याला उंदीर दिसला. उंदीर सैरावैरा पळत असताना त्याला पकडण्यासाठी एका व्यक्तीने लावलेल्या पिंजऱ्यात तो अडकला. उंदराच्या पाठोपाठ नागही पिंजऱ्यात गेला आणि तिथून अडकून पडला. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
येथील विनोद सूर्यवंशी यांचे सलूनचे दुकान आहे. या सलून दुकानात उंदीर जास्त असल्यामुळे त्यांनी उंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात उंदीर अडकला. त्याचवेळी या उंदराचा पाठलाग करत असलेला नाग उंदराला खाण्यासाठी पिंजऱ्यात गेला. त्या पिंजऱ्यातील उंदीर नागाने फस्त केला. परंतु त्या पिंजऱ्यातून त्याला काही बाहेर निघता आले नाही. गुरुवारी सकाळी विनोद यांनी दुकान उघडले असता त्यांना या पिंजऱ्यात नागोबा अडकून दिसला. त्यांनी लगेच याची माहिती तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सर्पमित्र संतोष कोरडे, नितीन बैस यांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन या पिंजऱ्यातून नागोबाची सुटका करून वनविभागाच्या साक्षीने जंगलात सोडण्यात आले.