गैरव्यवहार भोवला : सीईओंची कारवाईनागभीड: नागभीड ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली असताना या ग्रामपंचायतीचे सरपंच बेबीताई श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप गोविंदराव तर्वेकर यांना तसेच सदस्य पदावर राहण्यास अपात्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मुंबई ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशी अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रा.पं.चे सदस्य जहाँगीर कुरेशी आणि रमेश ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार करुन सरपंच श्रीरामे आणि उपसरपंच तर्वेकर यांचे कार्यकाळात १३ वा वित्त आयोग, पर्यावरण समृद्धी संतुलीत योजना आदी विविध योजनांमध्ये आर्थिक अनियमितता असून या आर्थिक अनियमिततेची चौकी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीत सरपंच आणि उपसरपंच यांचेवर जे नऊ आरोप लावण्यात आले होते. त्यात ते दोषी असल्याचे आढळून आले. त्यात ग्रा.पं.चा कोणताही ठराव नसताना ग्रामीण बँकेत खाते उघडणे, रोख पुस्तिकेत रकमांची नोंद न करता सरपंच व सचिवाने संगनमत करुन ३० मे २०१३ ते १५ जून २०१३ या कालावधीत १२ लाखांपैकी चार लाख रुपयांची उचल करणे, विकास आराखडा नसताना व कोणताही अंदाजपत्रक नसताना २७ सप्टे २०१३ ला ५७ हजार ६५० रुपयेचे देयक अदा करण्यात आले. पण हे साहित्य कशाकरिता खरेदी करण्यात आले याची कुठलीही नोंद नाही. पंचायत युवा क्रीडा अभियानातंर्गत ग्रामपंचायतीला ४८ हजार ९४८ रुपये प्राप्त झाले. यापैकी ३८ हजार २४० रुपये जानेवारी १२ मध्ये काढण्यात आले. पण ही रक्कम कोणत्या कामावर खर्च करण्यात आली याचा कोणताही अभिलेख ग्रा.पं. मध्ये उपलब्ध नाही. या सर्व कामात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने सरपंच व उपसरपंचावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागभीडचे सरपंच, उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र
By admin | Published: January 07, 2015 10:50 PM