बल्लारपूर : चंद्रपूर तथा बल्लारपूर येथील काही डॉक्टरांनी सायकल चालवा, प्रदूषण थांबवा, या उद्देशपूर्तीकरिता, तसा संदेश देत नागपूरहून सायकल यात्रा काढून काही तासात नागपूर - चंद्रपूर दरम्यानचे १५० कि.मीटरचे अंतर पार केले.चंद्रपूर येथील इंडियन मेडीकल असोसिएशन व सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकल यात्रा काढण्यात आली होती. मार्गात वरोरा तथा भद्रावती येथील डॉक्टर मंडळींनी या यात्रेचे स्वागत केले. या यात्रेत डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. युवराज भसारकर यांनी भाग घेतला होता. नागपूरहून पहाटे प्रारंभ झालेली ही यात्रा दुपारला चंद्रपूरला पोहचली. या यात्रेचे स्वागत संताजी होस्टेल येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेव गाडेगोणे हे होते. असोसिएशनचे डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. पियुष मुत्यालवार, डॉ. हर्ष मामीडवार, डॉ. सलाका मामीडवार, डॉ. अशोक भुक्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. वक्त्यांनी, या सायकल यात्रेची प्रशंसा करून, लोकांनी सायकलचा अधिकाधिक वापर करावा, डॉक्टरांनी स्वत: यावर अंमलबजावणी करून लोकांना प्रवृत्त करावे, असे सांगितले. संचालन डॉ.रवी अल्लूरवार, आभार प्रदर्शन डॉ. योगेश सालफळे यांनी केले. या सायकल यात्रेत सहभागी बल्लारपूर येथील डॉ. युवराज भसारकर हे रोज सकाळ व सायंकाळला किमान ३ किलोमीटर सायकल चालवीत असतात, हे विशेष !
डॉक्टरांनी काढली नागपूर-चंद्रपूर सायकल यात्रा
By admin | Published: January 23, 2017 12:38 AM